
राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर दारूची दुकाने सुरु करण्यास सरकारने सशर्त परवानगी दिली पण कोरोनाच्या भीतीमुळे प्रत्यक्षात दारूची मागणी कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी मळीचा साठा वाढण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे मळीच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अखेरीस परराज्यात व परदेशात मळी निर्यात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती व मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन 2019-20 मध्ये मळीचे उत्पादन कमी होण्याची भीती होती. त्याचा परिणाम परिणाम देशी-विदेशी मद्य इएनए व इथेनॉलवर निर्मितीसाठी आवश्यकता लक्षात घेता 30 सप्टेंबर 2020पर्यंत परराज्यात व परदेशात मळीच्या निर्यातीस बंदी घालण्यात आली होती.
मळीचा अतिरिक्त साठा
1 नोव्हेंबर 2019 च्या आकडेवारीनुसार साखर कारखान्यांमध्ये सुमारे 3. 02 लाख मेट्रिक टन मळी शिल्लक होती. चालू वर्षी अंदाजापेक्षा जास्त म्हणजे 24.10 लाख मेट्रिक टन मळीचे उत्पादन झाले. 9 जून 2020 रोजीच्या आकडेवारीनुसार साखर कारखान्यांकडे व राज्यातील आसवनींकडे 13.90 लाख मेट्रिक टन मळी शिल्लक आहे. 2020-21 वर्षाच्या हंगामात 36 ते 38 लाख मळीचे उत्पादन अपेक्षित आहे.
मळीची निर्यात
कोरोनाच्या भीतीमुळे दारुची मागणी व व्यवहार कमी झाल्याने मळीचा साठाही वाढत आहे. पण मळीच्या निर्यातीवर सध्या बंदी असल्याने एकीकडे मळीचा साठा आखणीन वाढणार आहे. त्यातून मळीची साठवणूक व प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. मात्र मळीच्या निर्यातीवरील बंदी उठवल्यास हे दोन्ही प्रश्न निकाली निघतील आणि मळी विक्रीस भाव आल्यास कारखान्यांवर अवलंबून असलेल्या शेतकऱयांनाही फायदा होईल. अखेरीस मळीचा वाढता साठा लक्षात घेऊन परराज्यात व परदेशात मळीच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.



























































