कोरोनामुक्त मालवण शहरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, सहा जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona

गेल्या महिनाभरात मालवण शहारात एकमेव कोरोना रुग्ण सापडला होता. 15 दिवसांपूर्वी सापडलेला तो रुग्ण शुक्रवारी पूर्णपणे बरा झाल्याने मालवण शहर कोरोनामुक्त झाले होते.

असे असताना शनिवारी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेल्या कोरोना तपासणीत शहरातील सोमवार पेठेतील एका कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या बँक कर्मचाऱ्याच्या पत्नी आणि मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. तर ग्रामीण भागात एका आंबा व्यावसायिकाकडील चार नेपाळी कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. रॅपिड चाचणीत हे सहा रुग्ण मिळून आले आहेत.

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात कोरोनाची लागण कमी प्रमाणात झाली. शहारात मास्क प्रभावीपणे वापर होतो. अन्यथा पालिका व पोलीस प्रशासन दंडात्मक कारवाई करते. त्यामुळे मालवणात कोरोना संक्रमण कमी आहे.

यापूर्वीही एकदा मालवण शहर कोरोनामुक्त शहर म्हणून जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर असताना एका हायस्कूल मधील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने शहराची कोरोना मुक्तीची संधी हुकली होती.

शुक्रवारीच शहरातील कोरोना रुग्णांची संख्या शून्य झाल्याने कोणत्याही क्षणी मालवण शहर अधिकृतरित्या कोरोना मुक्त म्हणून जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच शनिवारी शहरातील एका बँक कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेल्या रॅपिड चाचणीत निदर्शनास आले आहे.