
मुंबईत कोरोना पुन्हा वाढू लागल्यामुळे सतर्क झालेल्या पालिकेने आक्रमकपणे उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून दररोजच्या चाचण्यांचे प्रमाण 25 हजारांवरून 50 हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सोमवारपासून मुंबईत येणाऱया एसटी बस, खासगी गाडय़ा आणि रेल्वे प्रवाशांची चाचणी होणार आहे. तसेच मॉल, थिएटरच्या ठिकाणीही अँटिजन चाचणी करण्यात येणार आहे. दररोज एक लाख जणांचे लसीकरण करण्यासाठी खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांची संख्या 59 वरून 80 करण्यात आली आहे.
मुंबईत कोरोना वाढत असल्यामुळे पालिकेत शुक्रवारी दिवसभर मॅरेथॉन बैठका सुरू होत्या. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आणि संबंधित अधिकाऱयांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण वाढवण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. यामुळे दररोज 1 लाख या प्रमाणे 45 दिवसांत 45 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी आणि कोरोनाबाधेची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरण वाढवणे गरजेचे असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
…तर स्टेशनवरून थेट क्वारंटाइन
- बाहेरून मुंबईत येणाऱया प्रवाशांची अँटिजन कोरोना चाचणी करण्यात येईल. यामध्ये अर्ध्या तासात रिपोर्ट मिळेल. हा रिपोर्ट निगेटिव्ह असला तरच घरी सोडण्यात येईल. लक्षणे असल्यास थेट पालिकेच्या किंवा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येईल. लक्षणे नसल्यास आणि सुविधा असल्यास होम क्वारंटाइन होण्यास परवानगी देण्यात येईल.
- मॉल, थिएटरच्या ठिकाणीही याच पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल. यामध्ये एसटी, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी पालिकेकडून अँटिजन टेस्टची व्यवस्था केली जाईल. तर इतर ठिकाणी संबंधित आस्थापनांना ही व्यवस्था करावी लागेल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
खासगी रुग्णालयात दररोज 1 हजार डोस
सद्यस्थितीत 59 खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू आहे. मात्र 59 केंद्रांवर दररोज केवळ 4 हजार इतकेच डोस दिले जात आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांना दररोज 1 हजार डोस देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लब, लायन्स क्लबसारख्या सामाजिक व सेवाभावी संस्थांची मदत घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
24 तास लसीकरण करा
- सद्यस्थितीत सकाळी 9 ते सायंकाळी 5 आणि काही ठिकाणी आलेल्या लाभार्थ्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत लस दिली जाते. मात्र आगामी काळात लसीकरण वाढवण्यासाठी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत लसीकरण करावे आणि सुविधा असल्यास 24 तास लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
- सद्यस्थितीत पालिकेचे 24 व शासकीय 8 अशा 32 रुग्णालयांमध्ये दररोज किमान 41 हजार जणांना लस दिली जाते. तर खासगी रुग्णालयांत 59 खासगी रुग्णालयांत दिवसाला केवळ 4 हजार डोस दिले जातात. त्यामुळे खासगी रुग्णालयांना लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देश देण्यात आले.
पुन्हा जुलै पॅटर्न
गेल्या वर्षी रुग्णसंख्या वाढत असताना जुलैमध्ये सर्वाधिक प्रमाणात बेड आणि इतर आरोग्य यंत्रणा उभ्या केल्या गेल्या. त्याच धर्तीवर पालिकेची कोरोना केअर सेंटर्स, जम्बो कोविड सेंटर्स आणि खासगी रुग्णालयांमध्ये यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहेत. खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा 48 तासांत तयार ठेवाव्यात, खासगी रुग्णालयांनी दर्शनी भागात दरपत्रक लावण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. पालिकेच्या वॉर्डरूमच्या माध्यमातून रुग्णांच्या सुविधेसाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांना अकारण दाखल करून घेऊ नये, त्यांचे विलगीकरण घरी किंवा संस्थांत्मक करावे असेही निर्देशही देण्यात आले. रुग्णांना महागडी औषधे, इंजेक्शने देताना खासगी रुग्णालयांनी नातेवाईकांची संमती घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे. खासगी रुग्णालयात शासकीय दरपत्रकाप्रमाणे बिल आकारले जाणार असून यावर नजर ठेवण्यासाठी पालिकेच्या लेखापरीक्षकांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.
या ठिकाणी होणार अँटिजन चाचण्या
मुंबईत कुर्ला, मुंबई सेंट्रल, परळ, बोरिवली आदी एसटी स्टँडवर बस येतात. शिवाय बोरिवली, वांद्रे टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर बाहेरून प्रवासी मोठय़ा संख्येने उतरतात. या ठिकाणी प्रवाशांची अँटिजन टेस्ट केली जाईल. शिवाय खासगी बस येणाऱया बोरिवली, अंधेरी, प्रभादेवी, दादर, घाटकोपर, शीव, फोर्ट यासह शहर, पश्चिम आणि पूर्व उपनगरातील महत्त्वाच्या सर्व ठिकाणी अँटिजन टेस्ट होईल.























































