या धैर्याला सलाम, रुग्णशय्येवरून सीएच्या परीक्षेची तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेहऱयावर मास्क आणि चष्मा, बेडवर पुस्तके आणि पॅलक्युलेटर आणि बाजूला पीपीई किटमध्ये उभे असलेले वैद्यकीय अधिकारी… हे दृश्य आहे ओडिशातील कोविड रुग्णालयातील. तिथल्या बेडवर बसून एक युवक सीए परीक्षेची तयारी करत आहे. कोरोनाशी लढताना मनोधैर्य कायम ठेवून आपले ध्येय गाठण्याची जिद्द ठेवणाऱया युवकाचे सर्वच काैतुक करत आहेत.

आयएएस अधिकारी विजय कुलंगे यांनी सोशल मीडियावर रुग्णालयात सीए परीक्षेचा अभ्यास करणाऱया युवकाचा फोटो शेअर केला. कुलंगे हे गंजम जिह्याचे कलेक्टर आणि जिल्हा मॅजिस्ट्रेट आहेत. त्यांनी बेरहामपूर येथील एमकेसीजी मेडिकल कॉलेजचा नुकताच दौरा केला त्यावेळी त्यांना हा युवक दिसला. त्याचा फोटो काढून ट्विटरवर शेअर करत कुलंगे यांनी लिहिले, ‘यश योगायोगाने मिळत नाही. त्यासाठी समर्पणाची गरज आहे आणि तेच समर्पण तुमचं दु:ख विसरायला मदत करते. त्यानंतर यश म्हणजे केवळ औपचारिकता असते.’

बुधवारी सकाळी ट्विटरवर शेअर झालेल्या या फोटोला हजारो लाइक्स मिळाले आहेत. कोविडशी लढताना एका कठीण परीक्षेची तयारी करणाऱया युवकाच्या धैर्याला सारे सलाम ठोकत असून त्याला लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देत आहेत.