
हरियाणातून निलंगा येथील मशिदीत आलेल्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र उपचारानंतर ते सर्व रुग्ण तंदुरुस्त झाले असून त्यांना आता संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत बाहयरुग्ण विभागात एकुण 14 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून आतीपर्यंत एकूण 6108 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी एकुण 196 व्यक्तींचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 181 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून यापूर्वीच 4 एप्रिलला 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. पॉझिटिव्ह आलेल्या 8 रुग्णांची 14 दिवसानंतर पुन्हा तपासणी करण्यात आली होती. त्या सर्व 8 रुग्णांचे अहवाल दिनांक शनिवारी मिळाले आहेत. त्या सर्व 8 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ते 8 रुग्ण 18 ते 67 वर्ष वयोगटातील होते. त्यातील 57 वर्ष वय असलेल्या रुग्णांना मधुमेह होता. आता सर्व रुग्णांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये निलंगा येथे ठेवण्यात आले आहे. एकूण 7 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत 98 व्यक्तींचा होम क्वारंटाईन कालावधी संपला असून एकूण 67 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत होम क्वारंटाईनमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत. तसेच 24 व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. 07 व्यक्तींना या संस्थेच्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.




























































