
पैठण येथील शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या एका ब्रदरला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टर- परिचारिका यांच्यासह 32 जणांना क्वॉरंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शहरात शुक्रवारी ‘संपूर्ण संचारबंदी’ची घोषणा तालुका प्रशासनाने केली आहे.
हा ब्रदर नाथमंदिरातील भक्त निवास येथे वास्तव्यास होता. 16 मे रोजी हा ब्रदर ऊपचारासाठी संभाजीनगर येथे गेला होता. तेथील तपासणीनंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पैठण शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत तहसिलदार चंद्रकांत शेळके यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हा रुग्ण 6 दिवसांपूर्वीच संभाजीनगर येथे गेला आहे. तत्पूर्वी या ब्रदरच्या संपर्कात आलेल्या सरकारी दवाखान्यातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी यांच्यासह अन्य 32 जणांच्या तपासण्या करून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात येत आहे.
नगर परिषदेच्यावतीने नाथमंदिरातील भक्त निवास व यात्रा मैदानासह परिसरात जंतुनाशक फवारणी केली जात आहे. तसेच शुक्रवारी संपूर्ण दिवस शहरात 100 टक्के संचारबंदी घोषित करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिली. या काळात दवाखाने आणि मेडिकल वगळता सर्व आस्थापना आणि दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.




























































