विधानसभा पोटनिवडणुकीनंतर पंढरपूरची कोरोना स्थिती गंभीर, 16 हजार लोकांना लागण; 300 जणांचा मृत्यू

विधानसभा पोटनिवडणुकीनंतर पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. मृतांची संख्याही भयावह असून, निवडणूक प्रचारात सतत दिसणारे बहुतांश नेते गायब झाल्याने जनता हवालदिल आहे. पुरेशी लस नाही, बेड नाहीत, रेमडेसिविर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत पंढरपूर तालुक्याला फार मोठी किंमत चुकवावी लागली आहे. विद्यमान आमदार भारत भालके, माजी आमदार ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक, राजूबापू पाटील आदी नेत्यांचे कोरोनाने निधन झाले. पहिल्या लाटेची परिस्थिती नियंत्रणात येत असताना पंढरपूरची पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्षांनी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून सभा, मेळावे अन् प्रचार केला. निवडणुकीपूर्वी दिवसाला 100 ते 125 रुग्ण आढळून येत होते. मतदान झाल्यानंतर कोरोनाचा स्फोट झाला असून, रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. दुसऱया लाटेत पंढरपूर तालुक्यामध्ये कोरोनाचे 16 हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत. तर, 300 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पंढरपूर शहरात सध्या एकही बेड शिल्लक नाही. रुग्णांना सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात हलवावे लागत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची कमतरता, रेमडेसिविरचा अपुरा पुरवठा, लस नाही अशी सगळी बिकट परिस्थिती निर्माण झाली. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सतत बैठका घेत आहेत.

ग्रामीण भाग कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून, घरेच्या घरे कोरोनाबाधित होत आहेत. इलेक्शन डय़ूटीवाठी गेलेल्या दोन शिक्षकांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला. तर एका शिक्षकाच्या कुटुंबातील तीन व्यक्ती कोरोनाने दगावले आहेत.

पंढरपूर तालुक्याचा पॉझिटिव्हटी दर 35 टक्क्यांवर

पंढरपूर तालुक्याचा कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर 35 टक्क्यांवर पोहोचला आहे. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन पुकारला आहे. या लॉकडाऊनमुळे नवे कोरोना संक्रमण आटोक्यात येईल; पण ज्यांना लागण झाली आहे, त्यांना आरोग्य सुविधा कशा उभारणार, हा प्रश्न आहे. प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अभिजित मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, तहसीलदार सुशील बेल्हेकर, बीडीओ रविकिरण घोडके आदी अधिकारी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या