
जानेवारी-फेब्रुवारीत दररोज एक आकडी नोंद होणारी रुग्णसंख्या आता तीन आकडी झाली असून एकाच महिन्यात तब्बल तेरा पट रुग्ण वाढले आहेत. संपूर्ण जानेवारीत 128 तर फेब्रुवारीत फक्त 122 रुग्णांची नोंद झालेली असताना मार्चमध्ये तब्बल 1719 रुग्ण आढळले आहेत, तर राज्यात कोरोनामुळे मृत्यूही होऊ लागले आहेत. असे असताना कोरोना नियंत्रणासाठी नेमलेल्या आरोग्यतज्ञांच्या कोविड टास्क फोर्सने सुचवलेल्या कोणत्याही निर्देशाची अंमलबजावणी अद्याप राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली नाही. शिवाय ‘प्रिकॉशन’ डोससाठी लस शिल्लक नसताना कोणतीही कार्यवाही सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकार कोरोना स्थिती गंभीर होण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
विमानतळावर आणखी तीन बाधित
काही देशांमध्ये कोरोनाने पुन्हा थैमान घातले असल्याने केंद्र सरकारच्या गाइडलाइननुसार मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग आणि संशयितांची चाचणी करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत एकूण 55 कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये गेल्या दोन दिवसांत तीन नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. संबंधित रुग्णांची क्हेरिएंटची चाचणी करण्यासाठी बाधितांचे नमुने पुणे एनआयव्ही आणि पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेंन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.
मुंबईत दोनशेपार
– मुंबईत रुग्णसंख्या वेगाने वाढत असून गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 1655 चाचण्यांमध्ये 218 कोरोनाबाधित आढळले आहेत. यातील 21 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. यातील पाच जणांना ऑक्सिजनची गरज लागली.
– मुंबईत दिवसभरात 135 जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे मुंबईत सद्यस्थितीत 1162 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत सद्यस्थितीत रुग्ण बरे होण्याचा दर 98.2 टक्के तर रुग्णवाढीचा 0.0130 टक्के इतका आहे.
मुंबईचा कोरोना डॅशबोर्ड
आतापर्यंत आढळलेले रुग्ण – 11,57,529
कोरोनावर मात केलेले रुग्ण – 11,36,703
कोरोनामुळे झालेले मृत्यू – 19,747
सद्यस्थितीमधील सक्रिय रुग्ण – 1,162
मुंबई : 218
राज्य : 711
देश : 3038
128
जानेवारी
122
फेब्रुवारी
1719
मार्च
































































