
मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णवाढ सुरूच असून गेल्या 24 तासांत 7830 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 16 जणांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रात एकाच दिवसात नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर नव्या रुग्णांमुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 40 हजारांवर पोहोचली आहे. देशातील आजच्या रुग्णसंख्येने गेल्या सात महिन्यांचा रेकॉर्ड मोडला आहे.
देशात सक्रिय रुग्णांची संख्या 40 हजार 215 झाली. तर पॉझिटीव्हिटी रेट 3.65 टक्के झाला आहे. तर आठवडय़ाचा पॉझिटिव्हीटी रेट 3.83 टक्के झाला आहे. तर महाराष्ट्रात एकाच दिवसात 1115 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर नऊ जणांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. राज्याचा सध्याचा मृत्युदर 1.82 टक्के इतका झाला आहे. राज्यात एकाच दिवसात 560 जणांनी कोरोनावर मात केली. मात्र नव्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या 5421 इतकी झाली आहे. दरम्यान, परदेशातही कोरोना वाढत असल्यामुळे मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळावर येणाऱया प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यामध्ये गेल्या 24 तासांत विमानतळावर एक कोरोनाबाधित आढळला आहे.
चीनमध्ये बर्ड फ्लूने एकाचा मृत्यू
एकीकडे कोरोना वेगाने वाढत असताना बर्ड फ्लूचेही संकट घोंघावत असल्याने चिंता वाढली आहे. कारण चीनमध्ये कोरोनासह बर्ड फ्लूनेदेखील कहर केला असून आज एकाचा मृत्यूही झाला आहे. बर्ड फ्लू एच 3 एन 8 मुळे दक्षिण चीनच्या झोंगशान शहरात 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. विशेषतः पक्ष्यांपासून हा आजार होतो.
मुंबईत ओलांडला 300 चा टप्पा
मुंबई मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ कायम असून आज मुंबईत कोरोना रुग्णांनी 300 चा टप्पा पार केला. मुंबईत आज दिवसभरात 320 रुग्ण सापडले तर दोघा जणांचा मृत्य झाला. दरम्यान, सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडाही
1 हजार 577 वर पोहोचला आहे.
सीएम नाराज; साताऱयातील मास्कसक्ती मागे
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन सातारा जिल्हाधिकाऱयांनी सातारा जिह्यात मास्कसक्तीचे आदेश जारी केले होते. पण सरकारने आदेश जारी केलेले नसतानाही स्वतःच्या अधिकारात जिल्हाधिऱयांनी जारी केलेले मास्कसक्तीचे आदेश मुख्यमंत्र्याना रुचले नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱयांना फोन करून मास्कसक्तीबाबत विचारणा केली. अखेर ती मास्कसक्ती नव्हती तर आवाहन होते अशी भूमिका जिल्हाधिकाऱयांना घ्यावी लागली.
























































