
आम्हाला कोरोना झाला आहे, तुम्हालाही कोरोना संसर्ग केल्याशिवाय सोडणार नाही असे म्हणत एसआरपीएफच्या 16 जवानांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील एका परिचारिकेने केली आहे. तर या जवानांची समजूत काढून योग्य तो बंदोबस्त करावा अशी तक्रार करत जिल्हा शल्य चिकित्सकांनी एसआरपी समादेशक व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. विशेष म्हणजे आयसोलेशन वॉर्ड सोडून काही पॉझिटिव्ह जवान रुग्णालयाच्या गच्चीवर फिरत असल्याचे या पत्रात नमुद करण्यात आले आहे.
हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डामध्ये हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलातील 83 कोरोना पॉझिटिव जवानांवर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, यातील 16 जवानाबाबत रुग्णालयातल्या एका परिचारिकेने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी तक्रार केली आहे. दोन मे रोजी या परिचारिकेने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुरुवातीला रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह जवानांकडून कोणताही त्रास दिला जात नाही. मात्र, त्यानंतर दाखल झालेल्या पैकी सोहळा जवानांकडून सतत मानसिक त्रास दिला जात आहे. तसेच आयसोलेशन वॉर्डमध्ये काही कोरोना संशयित रुग्ण देखील आहेत. मात्र, वार्डात हे जवान स्वतःचे बेड सोडून फिरत असून उपचार करण्यासाठी गेल्यावर सतत त्रास देत असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह एसआरपीएफ जवान जिल्हा रुग्णालयाच्या गच्चीवर फिरत असल्याचा व्हिडिओ देखील दैनिक सामनाच्या हाती लागला आहे. हिंगोलीचे जिल्हा शल्यचिकित्सक किशोर श्रीवास यांनी सात मे रोजी राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशकांना पत्र लिहून या जवानांच्या वर्तणूकबाबत तक्रार केली आहे.
जवानांवर उपचार करणे सोयीचे होण्यासाठी योग्य तो बंदोबस्त करावा असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच काही जवानांकडून रुग्णालयातील स्टाफला होणाऱ्या त्रासाची माहिती या पत्रात देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना देखील या पत्राची प्रत पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराने हिंगोली चांगलीच खळबळ माजली आहे.




























































