
देशात गेल्या काही दिवसांत कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण चांगलेच सुधारले आहे. शनिवारी 36,652 नव्या रुग्णांची नोंद झाली. मात्र याचवेळी 42,533 रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले. देशातील कोरोनामुक्तांची एकूण संख्या 90 लाख 58 हजार 822 वर पोहोचली आहे, तर राष्ट्रीय रिकव्हरी रेट 94.88 टक्क्यांवर गेला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत 512 जणांचा विषाणूने बळी घेतला. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 96 लाख 8 हजार 211 झाली आहे. तसेच आतापर्यंत एकूण 1 लाख 39 हजार 700 जणांचा कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला आहे. विषाणूचा मृत्यूदर 1.45 टक्क्यांवर नियंत्रणात आहे. कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 70 टक्क्यांहून अधिक लोक हे विविध व्याधींनी त्रस्त होते, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशात सध्या कोरोनाच्या 4 लाख 9 हजार 689 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण 4.26 टक्के आहे. अनेक दिवसांपासून ऑक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 लाखांच्या खाली राहिली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.
- इंडियन काैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) आकडेवारीनुसार, देशात 4 डिसेंबरपर्यंत एकूण 14 कोटी 58 लाख 85 हजार 512 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. शुक्रवारी एका दिवसात 11 लाख 57 हजार 763 नमुने तपासण्यात आले.



























































