कोरोनावरील इंजेक्शनची साठेबाजी करणारा गजाआड , दिल्लीहून आणले होते इंजेक्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची लागण झाल्यावर शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनची  साठेबाजी करणाऱ्या उत्तराखंडच्या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने अटक केली. आझम नजीर खान असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी पंधरा लाख रुपयाचे इंजेक्शन जप्त केली आहेत.

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना अनेकदा ऑक्सिजनची गरज लागते. शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर ती वाढवण्यासाठी इंजेक्शनची गरज असते. या इंजेक्शनची सध्या प्रचंड मागणी आहे. या इंजेक्शनची साठेबाजी करून तीन पटीने विक्री होत असल्याची माहिती युनिट 9 चे सहायक निरीक्षक सुधीर जाधव आणि पोलीस शिपाई महांगडे यांना मिळाली.

या माहितीनंतर पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 9 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकाने सोमवारी वांद्रे यु टर्न ब्रीज खाली सापळा रचला. सोमवारी आझम हा तेथे आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून इंजेक्शनचे 15 बॉक्स जप्त केले. आझम हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. त्याने दिल्ली येथून एका मेडिकलच्या दुकानातून ते इंजेक्शन आणले होते. ते इंजेक्शन तो तीन पटीने विक्री करणार होता. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.