कोरोना रिपोर्ट रखडवणार्‍या लॅबवर पालिकेकडून ‘चाचणी बंदी’ची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रिपोर्ट रखडवणार्‍या दोन बड्या लॅबवर पालिकेने धडक कारवाई केली आहे. यामध्ये ‘मेट्रो पोलीस’ लॅबवर चार आठवडे तर ‘इन्फेक्शन’ लॅबवर एक आठवडा चाचणी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोना रिपोर्ट विलंबाने मिळत असल्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता असल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये कोरोना चाचण्या करण्यासाठी पालिकेच्या चार, राज्य सरकारच्या चार आणि इतर खासगी अशा 25 लॅब, त्यांच्या शाखांच्या माध्यमातून कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. या लॅबनी कोरोना चाचणीसाठी स्वॅब सॅम्पल घेतल्यानंतर दुसर्‍या दिवशी किंवा 48 तासांत रिपोर्ट दिला पाहिजे अन्यथा त्यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याआधीच दिला होता. या पार्श्वभूमीवर पालिका अधिकार्‍यांची पथके नेमून सरप्राईज व्हिजिटच्या माध्यमातून खासगी लॅबच्या कारभारावर नजर ठेवण्यात येत आहे. यामध्ये मुंबईत सुमारे 20 शाखा असलेली ‘मेट्रो पोलीस’ लॅब आणि मुंबईत सॅम्पल घेऊन ठाण्यात चाचणी करणारी ‘इन्फेक्शन’ लॅब रिपोर्ट देण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे काकाणी यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाचा प्रभाव पाहता पालिकेच्या माध्यमातून खासगी लॅबच्या कारभारावर यापुढेही देखरेख राहणार असल्याचे काकाणी म्हणाले.

मुंबईत दररोज 10 हजार चाचण्यांची क्षमता
मुंबईत सध्या असणार्‍या 25 लॅबच्या माध्यमातून दररोज 10 हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे. सद्यस्थिती दररोज उपलब्ध होणार्‍या सॅम्पलनुसार चार ते चाडेचार हजार कोरोना चाचण्या होत असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले. त्यामुळे दोन लॅबच्या दिरंगाईमुळे कारवाई करण्यात आली असली तरी चाचण्यांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत 10 जूनपर्यंत एकूण 2 लाख 42 हजार 923 कोरोना चाचण्या झाल्या असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.