कोरोनाच्या दुसऱया लाटेतही धारावीचा षटकार, सहाव्यांदा एकही रुग्ण नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना रोखण्यात धारावीने आघाडी घेतली असून दुसऱया लाटेदरम्यान आज सहाव्यांदा एकही रुग्ण सापडला नाही. धारावीबरोबर मध्य मुंबईतील वर्दळीचे भाग असणाऱया दादर आणि माहीममध्येही रुग्णसंख्या घटली असून दादरमध्ये 4 तर माहीममध्ये 6 रुग्ण सापडले.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि मुंबईतील सर्वात मोठी दाटीवाटीची वस्ती असलेल्या धारावीने कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱया लाटेवरही नियंत्रण मिळवले असून धारावीत आज सहाव्यांदा एकही रुग्ण सापडला नाही.

त्याचबरोबर सक्रिय रुग्णांची संख्याही गेले काही दिवस स्थिर असून धारावीत सध्या 21 सक्रिय रुग्ण आहेत. धारावीत या आधी 14 आणि 15 जूनला सलग दोन वेळा एकही रुग्ण सापडला नाही तर 23 जून, 4 जुलै आणि 7 जुलैला एकही रुग्ण सापडला नव्हता.

दादरमध्ये सक्रिय रुग्णसंख्या शंभरच्या पुढे

कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान दादरमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या मात्र अजूनही शंभरच्या पुढे आहे. मात्र दिवसाची सरासरी रुग्णसंख्या घटली असून आज दादरमध्ये 4 रुग्ण सापडले तर सक्रिय रुग्णांची संख्या अजूनही 144 आहे. माहीममध्येही रुग्णसंख्या एक आकडी असली तर त्यात चढउतार होत आहेत. माहीममध्ये आज 6 रुग्ण सापडले तर सक्रिय रुग्णांची संख्या 72 आहे.