कोरोनाची दुसरी लाट झाली सपाट, रुग्ण दुपटीचा कालावधी 404 दिवसांनी वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी कठोर निर्बंधांसह कोरोना चाचण्या, लसीकरण आणि जनजागृतीमुळे मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता सपाट होताना दिसत आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी एका महिन्यात तब्बल 404 दिवसांनी वाढून 527 दिवसांवर पोहोचला आहे. दिवसभराची रुग्णसंख्याही हजारच्या आत येत असून मृत्यूदराचा आकडा 75 वरून कमी होऊन 30च्या आत येत आहे तर कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या 90 टक्क्यांवरून 95 टक्क्यांवर पोहोचली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने पहिल्या लाटेत जेवढी तयारी केली होती त्यापेक्षा जास्त पूर्वतयारी दुसऱया लाटेविरोधात केल्यामुळेच रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढल्यानंतरही राबवलेल्या तत्काळ उपाययोजनांमुळे झपाटय़ाने कमी झाली. कोरोनाचा दुसरा विषाणू सापडल्यामुळे मुंबईची रुग्णसंख्या 11 हजारांवर पोहोचली. मुख्य म्हणजे रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड्स आणि ऑक्सिजन सिलिंडर्सची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली. मात्र, पालिकेने रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेल्या रेमडेसिवीरची खरेदी वाढवली तसेच ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा सुरळीत केला. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्याचे प्रकल्पही सुरू करण्याचा निर्णय घेतला. पालिकेच्या उपाययोजनांमुळे मुंबईत 5 मे रोजी मुंबई रुग्णसंख्या 3 हजार 879 वर तर मृतांचा आकडा 80च्या आसपास पोहोचला. रुग्ण दुपटीचा कालावधी 123 दिवसांवर पोहोचला. कोरोनामुक्त होणाऱयांचे प्रमाण 92 टक्क्यांवरून 90 टक्क्यांवर पोहोचले. मात्र, हा आकडाही मोठा असल्यामुळे पालिकेने निर्बंध कायम ठेवत मोठय़ा प्रमाणात कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर दिला. सर्वात जास्त धोका असलेल्या 45 ते 60 वर्षे आणि 60 च्या पुढील ज्येष्ठांच्या लसीकरणावर भर दिला. त्यामुळे त्यांना संरक्षण तर मिळालेच, पण रुग्णसंख्याही झपाटय़ाने कमी झाली.

धारावीत दिवसभरात 2 रुग्ण

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या आणि कोरोनाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील परिसर असलेल्या धारावीत आज 2 रुग्ण सापडले तर सक्रिय रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली आहे. दादरमध्ये दिवसभरात 8 तर माहीममध्ये 12 रुग्ण सापडले आहेत.