सुरतमध्ये स्मशानदाह; अविरत मृतदेह जळतायत, विद्युतदाहिनीच्या चिमण्याही वितळल्या

गुजरातमध्ये कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत भयानक बनत चालली आहे. कोरोनाबळींच्या संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे सुरतच्या स्मशानभूमींमध्ये 24 तास अंत्यसंस्कार केले जात आहेत. सतत पेटत्या राहिलेल्या चितांच्या उष्णतेमुळे विद्युतदाहिनीतील चिमण्याही वितळल्या आहेत. राज्यातील कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी भाजपचे रूपाणी सरकार सक्रिय कधी होणार, असा सवाल जनतेतून केला जात आहे.

इतर शहरांच्या तुलनेत सुरतमध्ये कोरोना संसर्गाची परिस्थिती फार भयानक आहे. शहरात मागील आठ-दहा दिवसांपासून स्मशानभूमींमध्ये दिवसरात्र मृतदेह जळताहेत. अश्विनीकुमार आणि रामनाथ घेला येथील स्मशानभूमीत कोरोनाबळींच्या अंत्यसंस्काराचे प्रमाण सर्वाधिक आहे. जवळपास 16 विद्युतदाहिनींमध्ये दररोज 100 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याचे स्मशानभूमीतील व्यवस्थापक हरीशभाई उमरीगर यांनी सांगितले. एकीकडे राज्यात कोरोना नियंत्रणात असल्याचा दावा राज्य सरकार करीत आहे. प्रत्यक्षात स्मशानभूमींमध्ये अत्यंत वाईट स्थिती असल्याचे व्हायरल व्हिडीओंमधून उघडकीस येत आहे.

ही आहे सुरतची वास्तव परिस्थिती

  •  स्मशानभूमीमध्ये दररोज 100 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार
  • 14 वर्षे बंद ठेवलेली तापी नदीकिनारची कैलाश स्मशानभूमी पुन्हा सुरू करावी लागली. इथे तीन दिवसांत 50 हून अधिक कोरोनाबळींवर अंत्यसंस्कार केले.
  •  अंत्यसंस्कारासाठी मृतदेह तीन ते चार तास वेटिंगवर.
  • सुरतमधील कोरोनाबळींचे मृतदेह शेजारच्या इतर शहरांतील स्मशानभूमींमध्ये पाठवण्याची वेळ.

कब्रस्तानमध्येही हीच अवस्था. रांदेरच्या दोन तर रामपुरातील एका कब्रस्तानमध्ये कोरोनाबळींचा दफनविधी केला जात आहे. या तिन्ही ठिकाणी दफनविधीसाठी आणल्या जाणाऱया मृतदेहांचे प्रमाण चार ते पाचपटीने वाढले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या