Exclusive – लहान मुलांमधील कोरोनाची लक्षणे ओळखा, वेळेत उपचार करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेचा धोका लहान मुलांनाही निर्माण झाला आहे. मुंबईसारख्या शहरात 2 टक्के मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. अशा परिस्थितीत लहान मुलांमध्ये कोणती लक्षणे आढळत आहेत आणि कोणती काळजी घ्यायला हवी यासंदर्भात वाडिया रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालक डॉ. शकुंतला प्रभू यांच्याशी केलेली बातचित…

 दुसऱया लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा अधिक संसर्ग होत आहे…

– पहिल्या लाटेतही लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळत होता, पण प्रमाण कमी होते. दुसऱया लाटेत हे प्रमाण वाढले आहे. विशेषतः मार्च महिन्यापासून लहान मुलांत कोरोनाचा अधिक संसर्ग दिसून येत आहे.

कोणती लक्षणे आढळत आहेत?

– लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला ही कोरोनाची सर्वसामान्य लक्षणे आहेतच. याव्यतिरिक्त पोटात दुखणे, मळमळणे, उलटी, जुलाब, मुले सुस्त होणे, चिडचिड करणे, त्यांना जेवण न जाणे  यासारखीही लक्षणे आढळून आली आहेत. त्याचप्रमाणे सध्या आढळणाऱया लक्षणांत डोळे लाल होणे, ओठ लाल होणे, शिरांवर ओरखडे येणे यांसारखी लक्षणेही आढळत आहेत.

कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण किती आहे?

– बहुतांशी लहान मुलांना कोरोना झाला तरी ती त्यातून बरी करण्यात आम्हाला यश येत आहे. पहिल्या आणि दुसऱया लाटेत आम्ही 280हून अधिक कोरोना झालेल्या मुलांवर उपचार करून त्यांना बरे केले आहे. विशेषतः वाडिया रुग्णालयात कोरोनाचे जे मृत्यू झाले, त्या मुलांमध्येही इतरही आजार होते. उदा. किडनी विकार, कर्करोग, हृदयविकार असे आजार त्यांच्यात आढळले. अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे काही मुलांचा मृत्यू झाला. मात्र हे प्रमाणही अत्यंत कमी आहे.

पालकांनी कोणती काळजी घ्यायला हवी?

– पालकांमुळे लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची उदाहरणे आढळली आहेत. त्यामुळे ज्या पालकांना कामासाठी बाहेर जावे लागते त्यांनी स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी किंवा लहान मुलांशी संपर्क अधिक येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. 2 वर्षांवरील मुले खेळण्यासाठी, वाढदिवस आदी कारणांसाठी बाहेर जात असतील तर त्यांना मास्क घालायलाच हवा. हात स्वच्छ धुणे, अंतर राखणे यासारख्या गोष्टींची त्यांना सवय लावायला हवी.

लक्षणे आढळल्यास किती दिवसांत रुग्णालयात आणायला हवे?

– सामान्यतः ताप आला आणि तो तीन दिवसांनंतरही उतरत नसेल त्याचप्रमाणे अन्य लक्षणे जर दीर्घकाळ दिसत असतील तर या मुलांची कोरोना चाचणी करून घ्यावी. त्यानंतर तर त्यांना रुग्णालयात आणून त्याच्यावर उपचार सुरू व्हायला हवेत. उशीर केल्यास त्यांची प्रकृती गंभीर होते व त्यांना बरे होण्यासही अधिक कालावधी लागतो. परिस्थिती अशी आहे की, पालक  तसेच 18 वर्षांवरील व्यक्ती लस घेऊ शकतात, मात्र लहान मुलांसाठी  अद्याप अशी लस आलेली नाही. त्यामुळे लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर रुग्णालयात घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू होणे आवश्यक आहे.