सोलापूरच्या सीमेवर होणार कोरोना तपासणी, जिल्हा परिषदेचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परजिल्ह्यांतून सोलापुरात येणाऱया संशयितांची जिल्ह्याच्या सीमेवर कोरोना तपासणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. संबंधित तालुक्यातील नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणीची सोय करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

कर्नाटकसह अन्य राज्यांतून सोलापुरात येणाऱया प्रवाशांची रेल्वे स्थानक, एसटी स्थानकांवर तपासणी केली जाणार आहे. तर, जिल्ह्याच्या सीमेजवळील नागरी आरोग्य केंद्रांवरही संशयितांची तपासणी केली जाणार आहे, असेही स्वामी यांनी सांगितले.

त्यानंतर महापालिकेने नियोजन केले असून, ग्रामीण भागात परजिल्ह्यांतून येणाऱया प्रवाशांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी चार पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच भरारी पथकांचीही नेमणूक केल्याचे त्यांनी सांगितले.  टेंभुर्णी, करमाळा, माळशिरस, नातेपुते, सांगोला, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर अशा ठिकाणीही तपासणीची सोय केली आहे.

परजिल्ह्यांतून तथा परराज्यांतून कोरोनाबाधित रुग्ण आपल्याकडे येऊ नयेत, त्यांच्यावर वेळेत उपचार व्हावेत, पुढील संसर्ग थांबावा, या हेतूने नियोजन केले आहे.

माझे गाव कोरोनामुक्त गाव

‘कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, या दृष्टीने नियोजन सुरू आहे. गावोगावी ‘माझे गाव कोरोनामुक्त गाव’ हे अभियान राबविले जात आहे. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये दुसऱया लाटेत 10 टक्क्यांची वाढ होईल, असे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आता कोरोना संशयितांची तपासणीही वाढविली जात आहे,’ असेही स्वामी म्हणाले.

सोलापूरात विनामास्क फिरणाऱया 194 जणांवर कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात विनामास्क फिरणाऱया 194 जणांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून 19 हजार 400 रुपये दंड वसूल केला आहे.

शहरातील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष नाकाबंदी करून पोलिसांनी 717 वाहने तपासून 194 जणांवर विनामास्कची कारवाई केली. 17 ऑगस्ट ते आजपर्यंत 15 हजार 590 जणांवर कारवाई करून सुमारे 15 लाख 82 हजार 600 रुपये दंड वसूल केला.

दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी विनामास्कबद्दल कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.

कोरोनावर निर्बंध आणण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. तसेच घराबाहेर पडताना तोडाला मास्क, सामाजिक अंतर व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन पोलीस आयुक्त शिंदे यांनी केले आहे.