राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात पुन्हा कपात, 300 रुपये झाले कमी – राजेश टोपे

930

राज्यात कोरोना चाचण्यांसाठीच्या दरात पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली आहे. तपासणीसाठी 300 रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार कोरोना चाचण्यांसाठी 1900, 2200 आणि 2500 रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्य शासनाने समिती नेमून काही दिवसांपूर्वी कोरोना चाचण्यांचे दर निश्चित केले होते. रुग्णालयातून रुग्णाचा स्वॅब घेतला, त्यासाठी 2200 रुपये दर आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेऊन तपासणी केली तर त्यााठी 2500 रुपये आकारण्याचा निर्णय झाला होता. काही व्यक्ती, रुग्ण स्वत: थेट प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करतात, त्यांच्याकडून 2800 रुपये आकारले जात होते. अशा वेळी त्यांच्याकडून 2800 रुपयांऐवजी 2500 रुपये आकारावेत, असे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले.

मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळे चाचण्यांसाठी लागणारे रिएजंटस्, व्हीटीएम किट व पीपीई किट यांची उपलब्धता वाढल्याने त्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे तपासणी खर्चातही कपात होणे आवश्यक होते. याबाबी लक्षात घेऊन प्रयोगशाळा व किटस् उत्पादकांशी चर्चा करून समितीने शिफारशींसह आपला अहवाल शासनला सादर केला. त्यानुसार चाचण्यांचे पुन्हा सुधारीत दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता सॅम्पल घेऊन त्याची वाहतूक आणि सॅम्पलचे रिपोर्टिंग यासाठी 2200 रुपयांऐवजी 1900 रुपये आकारण्यात येईल. तर स्वॅब कलेक्शन सेंटर, कोरोना केअर सेंटर्स, क्वॉरंटाईन सेंटरमधील येथून स्वॅब घेतल्यास 2500 रुपयांऐवजी 2200 आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास 2500 रुपये सुधारीत दरानुसार आकारण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या