
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे आरोग्य विभागाची आकडेवारी सांगते. ही दिलासादायक बातमी असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱया लाटेला निमंत्रण देऊ नका, असे आवाहन जनतेला केले आहे. आगामी सण आणि उत्सवांमध्ये गर्दी टाळा, तिसरी लाट येणार नाही याची खबरदारी घ्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्यातील कोरोना स्थितीचे सादरीकरण करण्यात आले त्यात ही माहिती देण्यात आली. परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्हय़ांत सक्रिय रुग्णसंख्या 100 पेक्षा कमी आहे. राज्यात आजच्या घडीला पाच कोटी सात लाखांपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधक डोस देण्यात आलेले आहेत.
…तर इतरांच्या आरोग्यालाही धोका
कोविडविषयक नियमांचे पालन न केल्याने तसेच गर्दी जमा करणे, मास्क न लावणे यामुळे स्वतःच्याच नव्हे, तर इतरांच्या आरोग्यालाही आपण धोका पोहचवत आहोत. कोणाच्याही आमिषाला किंवा चिथावणीला बळी न पडता स्वतःचा व इतरांच्या आरोग्याचा विचार करा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
रुग्णसंख्या 10 पेक्षा कमी
धुळे, वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया या सहा जिल्हय़ांत सक्रिय रुग्णसंख्या दहापेक्षाही कमी आहे.
या जिह्यांत सध्या रुग्णसंख्या अधिक
सध्याच्या जास्त रुग्णसंख्या असलेल्या जिल्हय़ांत सातारा, सांगली, नगर, पुणे, धाराशीव, सोलापूर, सिंधुदुर्ग या जिह्यांचा समावेश आहे.
कोल्हापूर-सातारा कोरोना उतरणीला
गेल्या काही दिवसांत कोल्हापूर, रत्नागिरीत रुग्णवाढीचा दर हा चिंताजनक होता; पण आजच्या घडीला दिलासादायक बाब म्हणजे, या जिल्हय़ांचा साप्ताहिक सरासरी रुग्णवाढीचा दर 2.44 टक्के यापेक्षाही कमी झाला आहे.
रुग्णसंख्या व मृत्यू
- आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण- 64 लाख 1 हजार 213
- बरे झालेले रुग्ण – 62 लाख 1 हजार 168
- एकूण मृत्यू – 1 लाख 35 हजार 255
- सक्रिय रुग्णसंख्या -61 हजार 306
(17 ऑगस्टची आकडेवारी)
केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरू राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत हे विसरता कामा नये. नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशी काही जणांची वर्तणूक पाहता चिंता वाटते.
सणांमध्ये नियमांचे उल्लंघन नको
राज्यातून प्रयत्नांची पराकाष्ठा करून संसर्ग एका मर्यादेच्या पलीकडे वाढू दिला नाही. यामध्ये ज्याप्रमाणे आपले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्स यांचे यश आहे, तसेच आपण नागरिक म्हणून घेतलेली काळजीदेखील महत्त्वाची आहे.
आगामी सण आणि उत्सव पाहता आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि कोविड योद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱया लाटेला आमंत्रण देणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
राज्यातील एक कोटी 33 लाख सात हजार नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. हा देशातील उच्चांक आहे.
ऑक्सिजनची उपलब्धता हा निकष
राज्यामध्ये ऑक्सिजनचे मर्यादित उत्पादन आहे. त्यामुळेच आपण निर्बंधाच्या बाबतीत ऑक्सिजनची उपलब्धता हाच निकष लावला आहे हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून आमच्या प्रयत्नांना आपल्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.






























































