माहुलला 1500 जम्बो सिलिंडर भरणारा ऑक्सिजन बॉटलिंग प्लॅट उभारणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेसाठी पालिका सतर्क झाली असून माहुल येथे दिवसाला 1500 जम्बो सिलिंडर भरणारा ऑक्सिजन बॉटलिंग प्लॅण्ट उभारला जाणार आहे. भारत पेट्रोलियम कंपनीकडून पालिकेला हा प्राणवायू मोफत मिळणार आहे. या ऑक्सिजन बॉटलिंग प्लॅण्टसाठी 21 कोटी 24 लाखांचा खर्च येणार असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

कोरोनाच्या दुसऱया लाटेत नव्या स्ट्रेनमुळे रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी झपाटय़ाने कमी होण्याच्या प्रकारामुळे मुंबईत रुग्णांची ऑक्सिजनची मागणी वाढली होती. सलग तीन दिवस पुरवठय़ातील तांत्रिक अडचणींमुळे आणीबाणीची स्थितीदेखील निर्माण झाली होती. मात्र पालिकेने नियोजनबद्धरीत्या युद्धपातळीवर काम करून तब्बल 176 रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांचे प्राण वाचवले. त्यामुळे येत्या काळात कोणत्याही स्थितीत ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी पालिका प्रभावी उपाययोजना करीत आहे. मुंबईला राज्य शासनाकडून दररोजसाठी 235 मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा निश्चित करून देण्यात आला आहे. दरम्यान, या प्लॅण्टमधील ऑक्सिजनचा वापर करून आणीबाणीच्या काळात दिवसाला 7.1 क्युबिक मीटर क्षमतेचे (जम्बो) 1,500 ऑक्सिजन सिलिंडर भरण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

…म्हणूनच घेतला निर्णय

  • मुंबई महापालिका सध्या डय़ुरा आणि जम्बो सिलिंडर रबाळे व तुर्भे येथील प्लॅण्टमधून रीफिल करून ऑक्सिजन घेत आहे. मात्र पालिकेला व खासगी रुग्णालयांना निकडीच्या वेळी या एकमात्र पुरवठादारावर विसंबून राहावे लागत आहे.
  • त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करता यावा आणि पालिकेने ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी आता मे.बीपीसीएल माहुलजवळील चिन्हांकित प्लॉटवर ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर भरण्यासाठी ‘ऑक्सिजन बॉटलिंग प्लॅण्ट’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
  • मे. बीपीसीएल कंपनीने पाइपलाइनद्वारे ऑक्सिजन बॉटलिंग प्लॅण्टमध्ये दिवसाला जवळपास 10 ते 15 मे.टन इतक्या ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आणि कोविड साथरोगाच्या काळात ऑक्सिजन विनाशुल्क देण्याचे मान्य केले आहे.