नाशिकमध्ये ‘अँटिजेन’द्वारे कोरोना चाचण्या सुरू, महापालिकेकडे 8900 किट उपलब्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्ती, गंभीर आजाराने त्रस्त रुग्णांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याने अर्ध्या तासात अँटिजेन किटद्वारे होणारे निदान महत्त्वाचे आहे. नाशिक महापालिकेकडे हे 8900 किट उपलब्ध झाले असून आज सलग दुसऱ्या दिवशी या पद्धतीने चाचण्या करून पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांवर त्वरित पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत.

नाशिक शहरात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे प्रयोगशाळेवरील नमुने तपासणीचा ताण अधिक आहे. हे लक्षात घेत महापालिकेने शासनाकडे कमी वेळात निदान करण्यासाठी अँटिजेन टेस्ट किटची मागणी केली होती. शासनाकडून 4000 किट मिळाले, तर महापालिकेने आणखी 4900 किट खरेदी केले. बुधवारपासून अँटिजेन किटच्या मदतीने कोव्हिड तपासणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली.

ही तपासणी फक्त बाधित रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती, वृद्ध आणि विविध आजारांनी त्रस्त नागरिकांसाठी आहे. वडाळा गाव येथे बुधवारी 12 जणांची तपासणी केली असता तिघे पॉझिटिव्ह आढळले. पंचवटीतील मायको दवाखाना येथे 79 जणांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 6 व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. गुरुवारी दुसऱ्या दिवशीही या दोन ठिकाणी या पद्धतीने चाचण्या सुरू होत्या. अवघ्या काही मिनिटांत निदान शक्य होत असल्याने रुग्णांवर पुढील उपचार तातडीने सुरू करता येतात. त्यामुळे ही चाचणी महत्त्वाची आहे.

अँटिबॉडी किटची मागणी करणार

अँटिजेन किटने रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही याचे निदान करता येते. यासाठी नाकातील स्वॅब घेतला जातो. दुसNया अँटिबॉडी टेस्ट किटमुळे हर्ड इम्युनिटी कळते. या किटची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे, असे डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले.