
गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या वाढत गेला, तसा जिल्हा प्रशासनाचा सावळा गोंधळ सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे. काल सोमवारी एकाच दिवसात कोरोना बाधीतांची संख्या चक्क 52 वर पोहोचली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शंभरी पार झाल्याचे वृत्त मध्यरात्री पासून काही प्रसिद्धी माध्यमांतून जाहीर झाले. परंतु जिल्ह्यात 83 एवढेच कोरोना रुग्ण असल्याची माहिती खाजगीत देणारे जबाबदार वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाकडून दुपारी बारा पर्यंत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. सीपीआरच्या डिन गजभिये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. साळी यांनी मिटिंगमध्ये असल्याचा मॅसेज पाठविला. त्यामुळे कोल्हापुरकरांसह सर्वच यंत्रणेत संभ्रमावस्था वाढली आहे.
प्रसिद्धी माध्यमांतील सूत्रांच्या माहितीतून, काल दिवसभरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्यांची संख्या 52 होऊन, जिल्ह्यात आतापर्यंत ही संख्या 101 झाली. सर्व रुग्ण मुंबई, पुणे, सोलापूर आदी रेडझोन भागातून आलेले आहेत. बघता बघता कोरोनाने कोल्हापूरात शतक ठोकल्याने, साहजिकच सर्वत्र धाकधुक वाढली असतानाच, काही माध्यमांनी जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोनांची संख्या 83 असल्याचे, काही विश्र्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले. त्यामुळे काल दिवसभरात 52 की 33 नवे रुग्ण आढळले? तसेच जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 83 की 101 कोरोना रुग्ण आढळले असा मोठा संभ्रम निर्माण झाला. यावरून आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाही याबाबत वस्तुस्थिती जाहीर करण्यास दुपारी बारा वाजले तरी एकही जबाबदार वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी पुढे आले नाहीत.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधीतांची एकाच दिवसात आढळलेली ही सर्वोच्च संख्या असून, रुग्णांबाबत माहिती मिळण्यास होणारा विलंब, प्रशासनाचा घोळ आणि तोपर्यंत नागरिकांमध्ये पसरणारी उलट-सुलट चर्चांमुळे धास्ती अधिक वाढली आहे. जिल्ह्यात गगनबावडा तालुका वगळता कोल्हापूर शहर आणि प्रत्येक तालुक्यात रुग्ण आढळल्याने, संपूर्ण जिल्हा कोरोनाबाधित झाला आहे.
राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्हा हा सुरक्षित समजण्यात येत होता. पण पुणे, मुंबई, सोलापूरसह अनेक रेड झोनमधून वशिल्यासह येणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाऊन, कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे.
लाॅकडाऊनच्या दोन महिन्यांत अवघ्या दहा ते पंधरा च्या आत असलेला कोरोशा बाधीतांचा आकडा गेल्या पाच-सहा दिवसांत 40 वर गेला. आज सोमवारी तर एकाच दिवशी तब्बल 52 रुग्ण आढळले. सकाळी पाच, दुपारी आणखी दोन, सायंकाळी अकरा अशी आकडेवारी वाढत गेली. त्यापुढे येथील आरोग्य यंत्रणा अत्यंत तोकडी पडली. कित्येक तास कोरोना रुग्णाची माहिती प्रशासनाकडे नव्हती. त्यामुळे नागरिकांसह प्रसिद्धी माध्यमांतही संभ्रमावस्था निर्माण झाली होती.




























































