‘एसएमएस’, ओळख, टोकन नंबर आणि कोरोना लसीकरण! राजावाडी, कूपर, बीकेसी कोविड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना आटोक्यात आला असतानाच लवकरच मुंबईत लसीकरणही सुरू होणार असल्यामुळे पालिकेच्या घाटकोपर राजावाडी, विले पार्लेच्या कूपर रुग्णालयासह बीकेसी कोविड सेंटरमध्ये आज कोरोना व्हॅक्सिनेशन यशस्वी ड्राय रन घेण्यात आले.

‘बीकेसी’ येथे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पालिकेने लसीकरणासाठी सद्यस्थितीत आठ सेंटर तैनात ठेवली असून व्हॅक्सीनच्या स्टोरेजसाठी चेंबूरसह प्रमुख रुग्णालयांमध्ये व्यवस्था केली आहे. दररोज 50 हजार जणांना लस देण्याचे उद्दिष्टय़ ठेवण्यात आले आहे.

मुंबईत मार्चमध्ये शिरकाव केलेला कोरोना नियंत्रणात आला तरी लसीकरण कधी सुरू होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. मात्र जगभरात फायझर, ऑक्सफर्ड लसींना परवानगी मिळाली असतानाच केंद्र सरकारने सिरम इन्स्टिटय़ूटच्या ‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या वापरासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे संपूर्ण देशासह मुंबईतही लवकरच लसीकरण सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने लसीकरणासाठी कोल्ड स्टोरेज आणि प्रत्यक्ष लसीकरणासाठी जय्यत तयारी केली आहे.

यात पालिकेने 762 मास्टर ट्रेनर तयार केले असून अडीच हजार कर्मचाऱयांना ट्रेनिंगही दिले आहे. गरजेनुसार मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे. लसीकरण पाच टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, 60 वर्षांवरील ज्येष्ठ आणि दीर्घ आजार असणाऱयांना लसीकरण करण्याचे पालिकेचे धोरण आहे. त्यामुळे काही दिवसांतच सुरू होणाऱया लसीकरणासाठी पालिकेने ड्राय रन घेतले.

बीकेसी येथे उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी आरोग्य समिती अध्यक्षा प्रवीणा मोरजकर, केंद्र शासनाचे प्रतिनिधी डॉ. सुधीर वंजे, बीकेसी जम्बो कोविड केंद्राचे प्रमुख डॉ. राजेश ढेरे यांच्यासह आरोग्य कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते. लसीकरणासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक तयारी केली जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे लसीकरणाबाबत नागरिकांना योग्य प्रकारे समजावून सांगत आहेत. त्यामुळे लोकांनी मनात कोणताही संभ्रम न ठेवता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापौर पेडणेकर यांनी या वेळी केले.

असे होणार लसीकरण

  • लसीकरणासाठी नोंदणी केल्यानंतर मोबाईलवर ‘एसएमएस’ येईल.
  • यानंतर लसीकरण केंद्रावर आल्यावर सुरक्षा रक्षकांकडून ओळख पटवली जाईल.
  • आलेला ‘एसएमएस’, ओळखपत्र तपासणी केल्यानंतर टोकन नंबर दिला जाईल.
  • यानंतर प्रतीक्षा कक्षात बसवले जाईल. टोकन नंबर आल्यावर लसीकरण कक्षात पाठवण्यात येईल.
  • या ठिकाणी अॅपवर लाभार्थ्याची संपूर्ण माहिती भरल्यानंतर प्रशिक्षित नर्स-आरोग्य कर्मचाऱयाकडून लसीकरण केले जाईल.
  • लसीकरणानंतर अर्धा तास प्रतीक्षा कक्षात थांबवले जाईल. डॉक्टर-आरोग्य कर्मचाऱयांची नजर असेल. यानंतरच घरी सोडले जातील.
  • लसीकरणादरम्यान कोणताही त्रास जाणवल्यास खबरदारी म्हणून सेंटरवरच आवश्यक डॉक्टर, बेड तैनात ठेवण्यात येतील.

अशी आहे व्यवस्था

बीकेसी कोविड सेंटरमध्ये स्वतंत्र इंट्री आणि एक्झिट पॉइंट आहे. पार्पिंग आणि 70 माणसांसाठी वेटिंग रूम तैनात ठेवण्यात आले आहेत. याशिवाय आठ रजिस्ट्रेशन युनिट्स, 50 माणसांसाठी निरीक्षण रूम आणि आपत्कालीन स्थितीसाठी आयसीयू बेड, तज्ञ डॉक्टर तैनात ठेवण्यात आले आहेत.

याशिवाय लसीकरणानंतर अॅलर्जी, ताप, उलटी यासारखे प्रकार घडल्यास डॉक्टरांशी संपर्प साधता येणार आहे. कूपर रुग्णालयात  40 डॉक्सर्ट-नर्स, 25 आरोग्य कर्मचाऱयांना ट्रेनिंग देण्यात आले आहे.

राजावाडी रुग्णालयात पाच बूथ तयार करण्यास परवानगी मिळाली असून प्रत्येक बूथवर 200 या प्रमाणे या ठिकाणी दररोज एक हजार जणांना लस दिली जाईल.