
कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत उपलब्ध लस साठ्याची मर्यादा लक्षात घेता आणि मोहिमेतील प्राधान्य लक्षात ठेवून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून लसीकरणाचे दैनंदिन नियोजन करण्यात येत आहे. 14 ते 16 मे 2021 या कालावधीत तसेच 17 मे 2021 रोजी तौत्के चक्रीवादळाच्या प्रभावाची शक्यता लक्षात घेता लसीकरण स्थगित करण्यात आले होते.
मंगळवारी 18 मे 2021 आणि बुधवार 19 मे 2021 रोजी मुंबईत लसीकरण सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे.
वादळासह पावसाने प्रभावित झालेली काही लसीकरण केंद्रे मंगळवार 18 मे 2021 रोजी बंद राहणार आहेत. कार्यरत राहणाऱ्या लसीकरण केंद्रांची यादी प्रसारमाध्यमे व समाज माध्यमांद्वारे नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येईल.
कोविशिल्ड लस देताना, केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, कोविशिल्डच्या पहिल्या मात्रेनंतर किमान 12 ते 16 आठवडे (किमान 84 दिवस) पूर्ण केलेल्यांनाच दुसरी मात्रा देण्यात येणार आहे. त्यामुळे 60 वर्ष वयोगटातील नागरिक 24 मे 2021 नंतर दुसऱ्या मात्रेसाठी पात्र राहतील.
याअनुषंगाने 18 मे 2021 आणि 19 मे 2021 या दोन्ही दिवशी कोविशिल्डच्या पहिल्या मात्रेसाठी 60 वर्ष व त्यावरील वयोगटातील नागरिकांना लसीकरण केंद्रावर थेट (वॉक इन) जाऊन लस घेता येईल. लसीकरण मोहिमेच्या नियोजनास मुंबईकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



























































