
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱयांसोबतच फ्रंटलाइन वर्करच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असताना तिसऱया टप्प्यात खासगी रुग्णालयांनाही लसीकरणाची परवानगी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी आवश्यक असणारे कोल्ड स्टोरेज, वेटिंग रूम, व्हॅक्सिनेशन रूम, प्रशिक्षित कर्मचारी आदी व्यवस्था असल्यास लसीकरणाची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. पुढील एका महिन्यात 3 लाख 60 हजार हेल्थ-फ्रंटलाइन वर्परचे लसीकरण झाल्यानंतर याची अंमलबजावणी सुरू होईल असेही ते म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 21 केंद्रांवर सध्या लस दिली जात आहे. मात्र सद्यस्थितीत पहिल्या टप्प्यात नोंदणी झालेल्या सुमारे 3 लाख 60 हजार आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्करचे लसीकरण सुरू आहे. यातील सुमारे एक लाख कर्मचाऱयांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना लस कधी मिळणार आणि खासगी रुग्णालयांत लसीकरण कधीपासून सुरू केले जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात खासगी रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा असल्यास लसीकरणाची परवानगी देण्यात येईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, तिसऱया टप्प्यात 50 वर्षांवरील नागरिकांसह दीर्घकालीन आजार आणि चौथ्या टप्प्यात 18 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येणार आहे. पालिकेकडे सध्या 2 लाख डोस शिल्लक असून पुढील आठवडय़ात आणखी दोन लाख डोस मिळणार आहेत.
कांजूरमार्गचे कोल्ड स्टोरेज सेंटरही सज्ज
मुंबईत कोरोना लसीचा साठा करण्यासाठी पालिकेने कांजूरमार्ग येथील स्वतःच्या इमारतीत कोल्ड स्टोरेजची व्यवस्था केली आहे. मात्र 16 जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण झाले नसल्यामुळे परळ येथील पी-दक्षिण कार्यालयाच्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी सध्या 10 लाख लसी साठवण्याची क्षमता आहे. तर आगामी काळात लसीकरणाची संख्या वाढल्यास आणि जादा लसी उपलब्ध झाल्यास तयार असलेल्या कांजूरमार्गच्या कोल्ड स्टोरेज सेंटरमध्ये लसी साठवल्या जातील.
महापालिका मुख्यालयातील कर्मचाऱयांनाही लस
पालिकेच्या ‘ए’ विभागाकडून प्रभागातील पालिका कर्मचाऱयांना कोरोना लस देण्यात येणार आहे. यामध्ये पालिका मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱयांनाही लस देण्यात येणार आहे. पालिकेच्या नायर व कस्तुरबा रुग्णालयात 17 फेब्रुवारीपर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लस टोचण्यात येणार आहे. विशेष म्हणजे लस टोचून घेण्यासाठी कोविन अॅप नोंदणीची अट शिथिल करण्यात आली आहे. मात्र आधार कार्ड किंवा पॅनकार्ड व स्वतःचे ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक राहणार आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर कोरोना लढय़ात आतापर्यंत पालिकेच्या 271 कर्मचाऱयांना जीव गमवावा लागला आहे.




























































