कोरोना लसीकरणात कोल्हापूर राज्यात अग्रस्थानी, डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात महाराष्ट्र राज्य सातत्याने पहिल्या क्रमांकावर असून, महाराष्ट्रात जिल्हानिहाय लसीकरणात कोल्हापूर जिल्हा अग्रस्थानी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 13 लाख 30 हजार नागरिकांचे लसीकरण झाले असून, लस वाया जाण्याचे प्रमाणही अत्यंत कमी असल्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले आहे. दरम्यान, संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, जिल्ह्यात 30 जूनपर्यंत एकूण 13 लाख 30 हजार 226 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात 45 वर्षांवरील 8 लाख 82 हजार 245 नागरिकांना पहिला, तर 2 लाख 15 हजार 620 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 वर्षे व त्यावरील लाभार्थींची अपेक्षित लोकसंख्या 12.74 लाख आहे. पहिल्या व दुसऱया डोसचे एकूण 10.98 लाख लसीकरण झालेले आहे. कोल्हापूर जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सातत्याने प्रथम क्रमांकावर असल्याचे आरोग्य राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात लस वाया जाण्याचे प्रमाण उणे 0.73

कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरणाला वेग देतानाच, लस वाया जाणार नाही याचीदेखील दक्षता यंत्रणेकडून घेतली जात आहे. 30 जूनच्या कोविन पोर्टलवरील अहवालानुसार, कोल्हापूर जिल्ह्यात लस वाया जाण्याचे प्रमाण उणे 0.73 असल्याचे निदर्शनास आले आहे.