तुटवडा कायम, लसीकरणाला फटका! आले फक्त 99 हजार डोस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत झपाटय़ाने वाढणारा कोरोना रोखण्यासाठी पालिकेने लसीकरण वाढवण्यासाठी संपूर्ण व्यवस्था उभी केली असताना केंद्राकडून पुरेशा प्रमाणात कोरोना लसींचे डोस मिळत नसल्याचा परिणाम लसीकरणावर झाला आहे. मुंबईत शुक्रवारी खासगी 71 आणि पालिकेच्या मिळून एपूण 90 केंद्रांवर लसीकरण बंद करावे लागले आहे. तर रात्री 99 हजार डोस आल्याने दुपारी 12 नंतर लसीकरण सुरू झाले. दररोज सुमारे 50 हजारांचे लसीकरण केले जात असताना शनिवारी 21 हजार 94 जणांनाच लस देण्यात आली.

लस तुटवडा असल्याच्या बातम्या पसरल्यामुळे अनेक केंद्रांवर सकाळपासूनच लाभार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. पण शुक्रवारी रात्री लसी आल्याने दुपारी 12 वाजता लसीकरण सुरू झाले. त्यामुळे सकाळपासून लसीकरण केंद्रांवर आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. यातच लसींच्या तुटवडय़ामुळे 71 खासगी लसीकरण केंद्रांवर तीन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आल्यामुळे उपलब्ध केंद्रांवर गर्दी वाढली. मुंबईत एकूण 120 लसीकरण केंद्रे असून त्यात पालिका-सरकारी केंद्रांची संख्या 49 आणि खासगी रुग्णालयांतील केंद्रांची संख्या 71 अशी आहे. शुक्रवारी रात्री पालिकेस 99 हजार लशींचा साठा मिळाल्याने पालिका, सरकारी केंद्रांवर शनिवारी लसीकरण सुरू झाल्याने काही मुंबईकरांना लस घेता आली.

लसीकरण केंद्रावर रखडपट्टी, वादावादी

शनिवारी लसीकरण दुपारी 12 नंतर सुरू झाले. मात्र याची माहिती लाभार्थ्यांना नव्हती. त्यामुळे सकाळपासून लाभार्थ्यांनी गदीं केली होती. लांबच लांब रांगा लागल्या. यातच पालिकेने नोंदणीशिवाय लस न देण्याचे जाहीर केले होते. शिवाय दुसऱया डोससाठी प्राधान्य दिले असले तरीही पहिल्या डोससाठी उत्सुक असलेल्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात होती.

नवे नियम माहीत नसल्यामुळे लसीकरण केंद्रांवर लाभार्थी आणि केंद्राकडील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टरांशी वादावादी झाली. दरम्यान, आवश्यक त्या प्रमाणात डोस उपलब्ध झाल्यास काही खासगी केंद्रांवर लसीकरण सुरू होईल अशी माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याने दिली. मात्र लसींचा पुरवठा किती होतो यावर ते अवलंबून असेल असे पालिकेने स्पष्ट केले.