Corona vaccine – रशियाने मारली बाजी, कोरोना लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी

32937

कोरोना विषाणूवर लस बनवण्याचे काम जगभरातील प्रयोगशाळेत सुरू असताना रशियाने यात बाजी मारली आहे. रशियाच्या सेचेनोव विश्वविद्यालयाने कोरोनावर लस तयार केल्याचा दावा केला आहे. या लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. हा दावा खरा असल्यास ही कोरोनावरील पहिली लस असणार आहे.

चीनमधून जगभरात पसरलेल्या या जीवघेण्या विषाणूने आजपर्यंत लाखो लोकांचे बळी घेतले आहेत. वैश्विक महामारी घोषित झालेल्या या विषाणूवर लस शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहेत. अमेरिकेसह जगभरातल्या अनेक विकसित देशातील प्रयोगशाळेत शास्रज्ञ यासाठी कष्ट घेत आहेत. मात्र रशियाने यात बाजी मारली आहे.

इंस्टीट्यूट फॉर ट्रान्सलेशन मेडिसिन अँड बायोटेक्नोलॉजीचे अधिकारी वदिम तरासोव यांनी याबाबत माहिती दिली. सेचेनोव विश्वविद्यालयाने 18 जूनला लसीची चाचणी सुरू केली होती. या लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. स्वयंसेवकांवर याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे, असेही वदिम तरासोव यांनी सांगितले.

लवकरच बाजारात आणणार
सेचेनोव विश्वविद्यालयाच्या इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल पैरासिटोलॉजी, ट्रॉपिकल अँड वेक्टर-बॉर्न डिजीजचे प्रमुख अलेक्जेंडर लुकाशेव यांनी कोविड-19 वरील लसीची यशस्वी चाचणी घेतल्याचे सांगितले. तसेच लवकरच ही लस बाजारात उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. ज्या स्वयंसेवकांवर याचे परीक्षण करण्यात आले त्यांना 20 जून रोजी डिस्चार्ज देण्यात आल्याचेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या