कोरोनाचा चीनमधून होणाऱ्या आयातीला गंभीर फटका; कार, स्मार्टफोन, औषधे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागणार

1200

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावाचा चीनबरोबरच हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार आहे. चीनमधून होणाऱया आयातीला फटका बसून हिंदुस्थानात कार, स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसेच काही औषधांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याची मोठी झळ बसणार आहे.

चीन हा हिंदुस्थानच्या सर्वात मोठय़ा ऑटोमोटिव्ह कंपोनेट सप्लायर्सपैकी एक आहे. हिंदुस्थानच्या ऑटो उपकरणांच्या गरजेपैकी 10 ते 30 टक्के आयात चीनमधून केली जाते. कोरोनाच्या फैलावाने चीनमधील उद्योग जगताची घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे हिंदुस्थानी ऑटो इंडस्ट्रीलासुद्धा आपले उत्पादन कमी करावे लागणार आहे. इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगाला आयातीसाठी दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. यंदा देशातील ऑटो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 8.3 टक्के घट होईल, असा अंदाज फिच या रेटिंग एजन्सीने वर्तवला आहे.

स्मार्टफोनच्या विक्रीत 10 ते 15 टक्क्यांची घट होणार
हिंदुस्थान जवळपास 6 ते 8 टक्के इलेक्ट्रॉनिक्स वस्तू चीनला निर्यात करतो, मात्र आपल्या गरजेच्या 50 ते 60 टक्के वस्तू चीनकडून आयात केल्या जातात. चीनमधील कंपोनेंट फॅक्टरी बंद होण्याचा परिणाम हिंदुस्थानातील स्मार्टफोन कंपन्यांवर दिसून येत आहे. श्याओमी कंपनीने स्मार्टफोनच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. चीनमधून आयात होणाऱया आयफोन-11 आणि 11 प्रो मॉडेलचा स्टॉक संपण्याच्या मार्गावर आहे. चीनमधून आयात होत नसल्यामुळे पुढील आठवडय़ापासून देशांतर्गत बाजारातील हॅण्डसेटचे उत्पादन ठप्प होऊ शकते. जानेवारी-मार्चच्या तिमाहीत स्मार्टफोनच्या विक्रीत 10 ते 15 टक्के घट होईल, असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे.

औषधे निर्मितीवर परिणाम होणार
औषधे बनवण्यासाठी एपीआय (ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल्स इंग्रीडिएंट्स) तसेच काही गरजेच्या औषधांसाठी हिंदुस्थान चीनच्या बाजारावर मोठय़ा प्रमाणावर विसंबून असतो. कोरोनाच्या संकटाची तीक्रता वाढली तर औषधे क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील बहुतांश औषधे कंपन्यांनी आपले काम थांबवले आहे.

चीनमध्ये 70 हजार थिएटर्स बंद, हिंदुस्थानी चित्रपटांची कमाई संकटात
अलीकडच्या काळात चीनच्या बाजारात हिंदुस्थानी चित्रपटांना मागणी वाढली आहे. दंगल, 3 इडियट्स यांसारख्या चित्रपटांना चीनमधील रसिकांनी तुफान प्रतिसाद दिला. परंतु, आता प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या हिंदुस्थानातील चित्रपटांना कोरोनामुळे चीनच्या मार्केटमध्ये पाय ठेवणे जोखमीचे वाटू लागले आहे. कोरोनाच्या फैलावानंतर चीनने जवळपास 70 हजार थिएटर्स बंद केली आहेत.

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार
आयातीला फटका बसून महागाईचा भडका उडण्याची शक्यता असताना पेट्रोल-डिझेलच्या दरात घट होण्याची चिन्हे आहेत. चीन हा क्रूड ऑईलचा मोठा आयातदार आहे. कोरोना फैलावामुळे चीनमधून कच्च्या तेलाची मागणी कमी झाली आहे. याचा आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या मागणीवर परिणाम झाला आहे. बेंट क्रूड मागील दीड महिन्यात 10 डॉलरने स्वस्त होऊन 55 डॉलर प्रति बॅरलवर आले आहे.

पर्यटन, हवाई क्षेत्राचेही नुकसान
गेल्या वर्षी हिंदुस्थानात पर्यटनासाठी आलेल्या विदेशी नागरिकांमध्ये चीनच्या नागरिकांचे प्रमाण 3.12 टक्के होते. कोरोनामुळे चिनी पर्यटकांचा हा टक्का घटेल. तसेच चीन आणि हाँगकाँगची उड्डाणे बंद करण्यामुळे हिंदुस्थानी एअरलाइन्सना प्रति विमान 55 ते 72 लाखांचे नुकसान होत आहे.

चीनमधील कोरोनाच्या बळींची संख्या 1500
चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. गुरुवारी येथील कोरोनाच्या बळींची संख्या 1483 वर पोहोचली. गुरुवारी एका दिवसात 116 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच 4823 नवीन रुग्ण दाखल झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या