
देशात कोरोनाचा कहर वाढल्यानंतर काही महिने विमानसेवा बंद ठेवावी लागली होती. लॉकडाऊननंतर पुन्हा विमानसेवा पूर्ववत झाली असून 20 ते 29 या वयोगटातील प्रवासी संख्या 25 टक्क्यांनी वाढल्याचे एअर एशिया या विमानसेवा देणाऱया कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. दुसरीकडे कोरोनाच्या भीतीमुळे 40 वर्षांवरील प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचेही दिसले आहे.
कोरोनाच्या प्रकोपानंतर 25 मे पासून टप्याटप्प्याने देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू झाली होती. लॉकडाऊननंतर प्रवाशांचा आढावा घेण्यासाठी एअर एशियाने नुकतेच हे सर्वेक्षण केले होते. साधारण अडीच हजार प्रवाशांचा सर्वेक्षणात अभ्यास करण्यात आला होता. लॉकडाऊनपूर्वी 20 ते 29 वयोगटातील विमानप्रवास करणाऱया प्रवाशांचे प्रमाण 25 टक्के होते. हे प्रमाण लॉकडाऊननंतर 25 टक्क्यांनी वाढले असून 42 टक्के झाले आहे.
30 ते 39 या वयोगटातील प्रवाशांचे प्रमाण 49 टक्क्यांहून 41 टक्कांवर आले आहे. 40 वर्षांवरील प्रवाशांची कोरोनाचा धसका घेतल्याचे दिसतेय. आधी 40 वर्षांवरील विमानप्रवाशांची संख्या 19 टक्के होती. आता हे प्रमाण अवघ्या 10 टक्क्यांवर आले आहे.
सर्वेक्षणातील 43 टक्के लोकांनी सुट्टीनिमित्त आपल्याला विमानप्रवास करायला आवडेल असे सांगितले. तर 14 टक्के लोकांनी कामानिमित्त प्रवासाची इच्छा व्यक्त केली.




























































