कोरोना आणि अफवांची ‘साथ’!

1100

>> डॉ. प्रदीप आवटे

नवीन कोरोना विषाणूच्या साथीमुळे चीनमध्ये एक हजारापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पण या विषाणूपेक्षाही कितीतरी वेगाने अफवांचा विषाणू जगभर पसरतो आहे. कोरोना विषाणूच्या पदराखाली तोंड झाकून वांशिक भेदभावाचा विषाणू गल्लीबोळातून फैलावतो आहे. रोगाच्या साथीकरिता इंग्रजीत आपण ‘इपिडिमिक’ असा शब्द वापरतो. सध्याच्या अफवांची साथ पाहता त्याला ‘इन्फोडेमिक’ असा शब्द तज्ञ वापरत आहेत.

माझ्या एका पत्रकार मैत्रिणीने मला व्हॉटस्ऍप मेसेज केला आणि मला विचारले, ‘डॉक्टर, हे खरं आहे का?’ मी चक्रावूनच गेलो. आम्ही येथे मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करतोय, कोरोनाचे निदान करणारी महत्त्वाची प्रयोगशाळा येथे पुण्यात आणि सातारा–सोलापूरच्या सीमारेषेवर करोना रुग्ण मला न समजता कसा येऊ शकतो? बातमी अर्थातच साफ खोटी होती. सफेद झूठ… फेक न्यूज. पण तिथे तालुका वैद्यकीय अधिकारी असणाऱया डॉ. रामचंद्र मोहिते यांना दिवसभरात शंभरएक फोन आले होते. जे येथे म्हसवडला घडले तेच हंगेरी, चीन आणि इतर अनेक देशांमध्येही घडते आहे.

चीनमध्ये आणि इतरत्र दिवसागणिक कोरोनाचे मृत्यू वाढत आहेत आणि त्यासोबतच अफवा, फेक न्यूजना नवे उधाण येत आहे आणि या अफवा, फेक न्यूज फक्त आपल्याकडेच आहेत असे नव्हे तर त्या जगभर फिरताना दिसत आहेत. साथी रोगांच्या असोत नाही तर अफवांच्या, त्या इतक्या वेगात पसरण्याकरिता काही कारणे आहेत. जागतिकीकरणासोबत आंतरराष्ट्रीय दळणवळण वाढले आणि म्हणूनच जगातल्या एका कोपऱयातील साथीचा आजार पार दुसऱया टोकाला पोहोचायला काही महिन्यांचा काळही पुरेसा ठरतो. स्वाईन फ्लूच्या वेळीदेखील आपण हे पाहिले आहे आणि अफवांची साथ वेगाने पसरायला कारणीभूत आहे, माहिती तंत्रज्ञानामधील क्रांती, इंटरनेट, सोशल मीडिया. अगदी तुलनाच करायची झाली तर 2003 मध्ये जेव्हा सार्स या विषाणूचा उद्रेक झाला तेव्हा जगातील धड पाच टक्केदेखील जनता इंटरनेट वापरत नव्हती. सोशल मीडिया अजून जन्मायचा होता. आज जगातील जवळपास 57 टक्के लोकसंख्या ऑनलाइन आहे. रोज सहा-सहा तास सोशल मीडियावर पडीक आहे आणि यामध्ये दर सेकंदागणिक, दर दिवसागणिक वाढ होत आहे. दर दिवसाला जवळपास 10 लाख नवे लोक इंटरनेटवर येताहेत. या सगळय़ांमुळे अफवा पसरण्याचा वेग आणि व्याप्ती प्रचंड वाढली आहे. ‘सत्य चप्पल घालेपर्यंत खोटं आख्खं गाव फिरून येतं’ ही गावाकडली म्हण आजच्या ग्लोबल गावामध्ये अधिक खरी ठरली आहे. खरं-खोटं, अफवा, भूलथापा पूर्वीपण होतेच. आज त्याचा वेग, व्याप्ती आणि म्हणूनच परिणामही मोठा होतो आहे.

पण अशा क्रायसिसमध्ये माणसे खोटे का बोलतात, अशा अफवा का पसरवतात? खरं म्हणजे त्यांना खोटे बोलायचे नसते. त्यांच्या मनात मृत्यूचे भय असते. मनात चिंतेचे ढग असतात. यातून ते काहीबाही अशा काळात जवळच्या माणसाची काळजी घेता येईल, असे परस्परांना पाठवत राहतात. कुणी चिनी आजोबा आपल्या नातवांना वुई चॅटवरून ‘कोरोना विषाणू ऍसिडला घाबरतो म्हणून नाकात व्हिनेगारमध्ये भिजलेला कापसाचा बोळा ठेवावा,’ असा मेसेज करतो. नातू तोच मेसेज आपल्या गर्लफ्रेंडला पाठवतो, ती तिच्या मैत्रिणीला, ती तिच्या बॉयफ्रेंडला’ अशी मालिका सुरू होते. पण त्या सगळय़ा आडनिडय़ा आणि बिनबुडाच्या मेसेजमागे चिंता असते, काळजी असते. मला यातले काही माहीत आहे, हे दाखवून स्वतःला जरा शहाणे म्हणून सिद्ध करण्याची हौसही असते. जे चीनमध्ये होते तेच आपल्याकडेही होते. कुणी म्हणतो कोरोना टाळण्यासाठी लसणाच्या पाकळय़ा खा, कुणी म्हणतो कडुनिंबाचा पाला खा, कढीपत्ता खा, तर कुणी सांगतो चिकन, मासे, अंडी खाऊ नका. आधार कशालाच नसतो. प्रत्येकजण मरणाच्या भीतीने कळपामध्ये सामील झालेला असतो आणि काळजीवाहू भूमिका अदा करत असतो. पण काही अफवा या मार्केटिंग गिमिक असतात. कोरोनाचे औषध माझ्याजवळ आहे, असं सांगून कुणी खोटी जाहिरात करतो. कुणी तीळ तेल, नीलगिरी तेल या आजारांमध्ये गुणकारी आहे असे मेसेजच व्हायरल करत धंदेवाईक लोक अशा गोष्टींचा साठा करत त्या चढय़ा भावाने विकत आपले उखळ पांढरे करतात आणि ऐन मोक्याला मास्कसारख्या गोष्टीचा तुटवडा जाणवू लागतो.

घाबरट माणसे भीतीदायक गोष्टी पसरवत जातात. चीनमध्ये सरकार सर्व कोरोना रुग्णांना मारणार असल्याची तद्दन खोटी बातमी केवळ सोशल मीडियापुरती राहत नाही तर आपली मुख्य प्रवाहातील माध्यमे ती दाखवतात, छापतात. काय बोलणार? अशा बातम्यांमुळे संशयित रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती होण्याला किती अडचण येईल, लोक आपला आजार लपवतील याचा विचारही ही फेक न्यूज पसरवणाऱया लोकांच्या मनात येत नाही. व्हायरस अफवा होतो आणि अफवा व्हायरल होते, हेच खरं.

कोरोना, स्वाईन फ्लू, इबोला अशी संकटे येतात तेव्हा आपल्या माणूसपणाचा आणि माणसाच्या समाजाचा कस लागलेला असतो. परवा बर्लिनमध्ये कुणीतरी वेडय़ासारखा एका मध्यमवयीन चिनी महिलेवर हल्ला केला, का तर तिच्यामुळे कोरोना येईल ही भीती. आपल्याकडे चीनमधून आलेल्या आपल्या कर्मचाऱयांना काही कंपन्या रुजू करून घ्यायला तयार नव्हत्या, मेडिकल सर्टिफिकेट मागत होत्या. केरळमध्ये निपा उद्रेक झाला तेव्हाही असेच झाले होते. अशी भीती बाळगण्याचे काहीच कारण नसते. एखाद्या भागात एखादा उद्रेक झाला म्हणून तिथली सगळी माणसे संसर्गजन्य नसतात. पण समजावणार कोण? प्रेमापेक्षा, काळजी आणि जिव्हाळय़ापेक्षा असा भेदभाव अधिक संसर्गजन्य असतो की काय कोण जाणे? या ना त्या कारणाने माणसांना वाळीत टाकणे आपल्याला आवडत असावे, दुसरं काय? हे केवळ सर्वसामान्य माणसांबाबतच घडते असे नाही. डॉक्टर, नर्सेस यांच्या बाबतीतही ते घडते. जिवाची बाजी लावून रुग्ण सेवा करणारे डॉक्टर्स, नर्सेस जसे असतात तसेच अशा वेळी रुग्णाला हात लावणे तर सोडा त्याचा केस पेपरही हातात न घेणारे डॉक्टरही मी प्लेग साथीत पाहिले आहेत.

प्रत्येक साथ आपल्याला काही शिकवत असते. कोरोनाची साथही त्याला अपवाद नाही. आपण सर्वांनीच अंतर्मुख होऊन आपापल्या भूमिका समजावून घेतल्या पाहिजेत. येणारा कोणताच विषाणू तुमचे, माझे माणूसपण संपविण्याइतका बलवान असता कामा नये.

समंजस ‘आरोग्य पत्रकारिते’ची गरज
सार्स, स्वाईन फ्लू आणि कोरोनासारख्या भयंकर संसर्गजन्य आजारांच्या उद्रेकप्रसंगी माध्यमांची भूमिका अधिक जबाबदार असण्याची गरज असते. विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमावर आपण अशा साथीच्या बातम्या उगीच नाटकी करून टाकतो. गूढ आवाजात नव्या आजाराचे थैमान नवा विषाणू तुमच्या घरापर्यंतही येणार काय? असे काही तरी बोलत वस्तुस्थिती नेमकी मांडण्याकडे दुर्लक्ष करतो. स्वाईन फ्लूच्या वेळी शंभरावा मृत्यू आपल्याला लवकर कळावा, यासाठी हॉस्पिटलबाहेर उभ्या असलेल्या चॅनेलच्या गाडय़ा आणि क्षणोक्षणी वाजणारे फोन मला अजून आठवतात. चमकी आजारात हॉस्पिटलमध्ये शिरून रुग्णाला उपचार देणाऱया डॉक्टरला वेडेवाकडे प्रश्न विचारणारी आपल्या लक्षात असेलच. ‘एक्सक्लुजिव्ह’ नादात आपण माणूसपणाला पारखे न होण्याची काळजी घेतली पाहिजे. एका स्वच्छ समंजस ‘आरोग्य पत्रकारिते’ची गरज कुणीच नाकारणार नाही.

(लेखक महाराष्ट्र आरोग्य सेवेत राज्य सर्वेक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या