
ताप, थकवा, खोकला, सर्दी, घसा खवखवणे, अतिसार, अशक्तपणा ही कोरोनाची सर्वसामान्य लक्षणे आहेत. काहीजणांमध्ये ही लक्षणे सौम्य असतात, तर काहीजणांमध्ये कोणतेही लक्षण आढळत नाही. मधुमेह आणि हृदयरोग असणाऱ्यांना कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असल्याचे संशेधनातून दिसून आले आहे. तसेच कोरोनामुक्त झाल्यानंतरही अनेकांना त्रास होतो. आता कोरोना व्हायरस डोळ्यांवरही हल्ला करत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. त्यामुळे संशोधकांची चिंता वाढली आहे.
कोरोनाचे संक्रमण झाल्यास काही रुग्णांमध्ये नेत्रदोषही दिसून येत आहेत. त्यामुळे चव आणि गंध न कळणे यासारखी अनेक कोरोनाची लक्षणे संशोधनातून समजली होती. त्याचप्रमाणे आता कोरोना व्हायरस डोळ्यांवरही हल्ला करत असून नेत्ररोग असल्यास कोरोना संक्रमण झाल्याचे लक्षण असू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे. याबाबत अधिक संशोधन होण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या या संक्रमणाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर दृष्टी जाण्याची भीतीही संशोधकांनी व्यक्त केली आहे. राजधानी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातील अनेक रुग्णांना नेत्रदोषाच्या समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले. सुरुवातील प्रदूषणाचा परिणाम असावा, असा अंदाज डॉक्टर व्यक्त करत होते. मात्र, आता हे कोरोना संक्रमणाचे लक्षण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संक्रमणाला कोविड 19 म्युकोर्मीसिस म्हणतात. यामध्ये कोरोनाबाधितांना कमी किंवा धूसर दिसते. त्याकडे दुलर्क्ष केल्यास दृष्टी जाण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दिल्लीत गेल्या 15 दिवसात 13 रुग्ण म्युकोमोसिसचा त्रास असलेले आढळले आहेत. करोनामुक्त झालेल्या अनेक रुग्णांना थकवा येणे, सांधेदुखी, अशक्तपणा अशा प्रकारचा त्रास जाणवतो. आता काही कोरोनामुक्त झालेल्यांना दृष्टीदोषांच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरस डोळ्यांवरही हल्ला करत असल्याचे दिसून येत आहे.
म्युकोर्मीसिसचे संक्रमण याधाही काही रुग्णांना झाले आहे. मात्र, त्याचे प्रमाण कमी होते. कोरोनामुळे त्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. श्वसनाचा त्रास असलेल्यांना किंवा कमी रोगप्रतीकारक शक्ती असलेल्यांना या संक्रमणाचा जास्त धोका असतो. 10 म्युकोर्मीसिस रूग्णापेकी 50 टक्के रूग्णांना दृष्टी गमवावी लागते, असे आकडेवारीतून दिसून आले आहे. त्यामुळे डोळ्यांचा त्रास किंवा नेत्ररोग असल्यास त्याकडे दुर्लक्ष करून नये, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

























































