#Corona बीपीटीमध्ये उपलब्ध होणार ४ हजार बेड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या (बीपीटी) जागेत कोरोना रुग्णांसाठी 4 हजार बेड उभारणे शक्य आहे. त्या दृष्टीने बीपीटी प्रशासन आणि त्यांच्या प्रमुखांशी चर्चा सुरू असून बीपीटी प्रशासन याबाबत सकारात्मक आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, भविष्यात रुग्णांची संख्या वाढली तर खबरदारीचा उपाय म्हणून बीकेसी, गोरेगाव, वरळी डोम, महालक्ष्मी रेसकोर्स अशा ठिकाणी मोठ्या संख्येने बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. या जागांबरोबर इतरही जागा उपलब्ध झाल्या तर कोरोना रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा देता येतील. त्या पार्श्वभूमीवर, महापौर किशोरी पेडणेकर यांनी बीपीटी परिसर आणि आयमॅक्स चित्रपटगृहाची पाहणी केली. भविष्यात कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध होणारे बेड आणि सोयीसुविधांबाबत नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून ही पाहणी करण्यात आली. यावेळी खासदार अरविंद सावंत, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, नगरसेवक मंगेश सातमकर, सचिन पडवळ, रामदास कांबळे, एफ/दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर आदी उपस्थित होते.

इतर जागांबाबतही विचार सुरू
मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ/दक्षिण’ विभागात येणाऱ्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेसह, आयमॅक्स सिनेमागृह, कोलगेट कंपनी, कॉटन वेअरहाऊस या सर्व ठिकाणांच्या मोकळ्या व बंदिस्त जागेमध्ये आपत्कालीन परिस्थितीत कशा प्रकारे नियोजन करता येईल, याची चर्चा करण्यात आली तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मोठ्या संख्येने कम्युनिटी किचनसाठी जागा उपलब्ध होऊ शकते का, याबाबतसुद्धा पाहणी करण्यात आली, अशी माहिती महापौरांनी दिली.