#coronavirus कोरोनानंतर आता चीनमध्ये भूकंपाचं संकट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 361 लोकांचा जीव गेला आहे तर 17 हजारांहून अधिक जण कोरोना ग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. अनेक देशांनी आपल्या नागरिकांना चीनमध्ये जाण्यापासून मनाई केली आहे. चीनच्या दिशेने जाणारी सर्व विमान उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. अशा भीषण परिस्थितीत चीनमध्ये भूकंप झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.

नैर्ऋत्य चीनमध्ये सोमवारी भूकंपाचे जाणवले आहेत. हा भूकंप जिथे झाला तिथून 38 किलोमीटर अंतरावर असलेल्या चेंगडू या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप जमिनीच्या आत 21 किलोमीटर खोल झाला आहे. या भूकंपाची तीव्रता 5.1 रिक्टर स्केल इतकी आहे. भूकंपाचे धक्के बसल्यानंतर लोक घरातून बाहेर पडू लागले आणि रस्ते, मैदानांवर लोक जमा होऊ लागले. भूकंपानंतर चीन प्रशासनाने त्वरित बचाव कार्य सुरू केलं आहे. जवळपास 150 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

कोरोनामुळे चिनी नागरिकांना घरातच राहण्याची सक्ती चीन सरकारने केली होती. मात्र, या भूकंपामुळे अनेक लोक एकत्र जमले होते. त्यामुळे आता या भूकंपग्रस्तांच्या आरोग्याची तपासणी करण्याचं आणि रोगाचा प्रसार थांबवण्याचं नवीन आव्हान चीनपुढे उभं राहिलं आहे.