कोरोनाची दहशत वाढतीच! जगभरात 3000 बळी, 88 हजार लोकांना लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनमधून फैलावलेल्या कोरोनाची जगभरातील दहशत वाढतीच आहे. सोमवारी या महाभयंकर विषाणूच्या बळींची संख्या 3 हजारांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर 88 हजार लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. एकट्या चीनमध्ये सोमवारी एका दिवसात 42 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला, तर दक्षिण कोरियात कोरोनाचे 500 नवीन रुग्ण आढळले. विविध देशांत हातपाय पसरणाऱ्या या विषाणूला आळा घालायचा कसा, असा यक्षप्रश्न सध्या जगासमोर उभा ठाकला आहे.

चीनची हद्द ओलांडलेल्या कोरोनाने 60 अधिक देशांत शिरकाव केला आहे. रविवारी अमेरिका आणि हिंदुस्थानात या विषाणूने दोघांचा बळी घेतला. जागतिक महासत्ता म्हणून ओळख असलेल्या अमेरिकेतही कोरोना बळीची नोंद झाल्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. सोमवारी चीनच्या हुबेई प्रांतात 42 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यामुळे चीनमधील बळींची संख्या 2912 वर गेली आहे, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाकडून देण्यात आली.

इराणमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 978 वर पोहोचली
इराणमध्ये कोरोना विषाणूमुळे सोमवारी आणखी 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या देशातील कोरोनाबळींची संख्या 54 झाली आहे, तर कोरोनाग्रस्तांची संख्या 978 वर पोहोचली आहे. चीनपाठोपाठ इराणमध्ये कोरोना विषाणूने सर्वाधिक बळी घेतले आहेत.

कोरोनाच्या अफवेचा पोल्ट्री फार्मना फटका
कोरोनाची लागण कोंबडय़ांनाही झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. याचा फटका राज्यातील पोल्ट्री फार्मना बसून अनेकांना व्यवसाय बंद करावा लागला आहे. त्यामुळे पोल्ट्री फार्ममध्ये काम करणारे काही जण बेरोजगार झाले आहेत. तर बँकेचे हप्ते कसे फेडायचे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

8 दिवसांवर होळी आहे आणि या दिवसांमध्ये चिकनला मोठय़ा प्रमाणात मागणी असते; परंतु कोरोनाच्या भीतीमुळे कोणीच चिकन घ्यायला तयार नाहीत. परिणामी व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागला. सोशल मीडियातून येणाऱया अफवांमुळे चांगल्या सुरू असलेल्या व्यवसायात होत्याचं नव्हतं झालं.