
कोरोनाच्या जागतिक संकटामुळे महासत्ता असणारी अमेरिकाही हतबल ठरत असल्याचे दिसत आहे. आपण आता या जागतिक संकटाच्या केंद्रस्थानी आलो आहोत, असे वक्तव्य नुकतेच न्यूयॉर्कच्या महापौरांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याची प्रचिती आता अमेरिकेला येत आहे. अमेरिकेमध्ये कोरोनामुळे 24 तासात 100 जणांचा मृत्यू झाला आहे. 24 तासात एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 389 वर गेली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने ही आकडेवारी जारी केली आहे.
न्यूयॉर्क,वॉशिंग्टन आणि कॅलीफोर्नियामध्ये कोरोनाचे सर्वाधिक संक्रमण झाले आहे. कोरोनामुळे न्यूयॉर्कमध्ये 114, वॉशिंग्टनमध्ये 94 तर कॅनिफोर्नियामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार अमेरिकेत 30 हजारपेक्षा जास्त जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. तसेच सिनेटर रँड पॉल यांनाही कोरोनाचे संक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या आरोग्य तपासणीत त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पॉल यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असून ते विलगीकरणात असल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले आहे. रँड यांना कोरोनाचे संक्रमण झाल्याने कोरोनाचे लोण अमेरिकेच्या सिनेटपर्यंत पोहचले आहे. कोरोनाचे संक्रमण होणारे पॉल हे पहिले सिनेटर आहेत. आपल्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. मात्र, दौरा आणि अनेक कार्यक्रम केल्याने सुरक्षेच्या दृष्टीने आरोग्य तपासणी केली असता, आपला अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. एखाद्या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही कोरोना संक्रमित व्यक्तीशी आपला संबंध आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पॉल यांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला असून सर्व व्यापार आणि उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. त्यामुळे अनेक जणांच्या रोजगारावर टांगती तलवार आहे. शाळा महाविद्यालये बंद असून लोक घरातच कैद झाले आहेत. या परिस्थितीमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. नागरिकांच्या मनात कोरोना व्हायरस आणि लॉक डाऊन अशी दोघांची दहशत निर्माण झाली आहे. वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया,इलिनोइस या ठिकाणी लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करण्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

























































