
जगभरात हाहाकार माजवणाऱ्या आणि जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना व्हायरसवर प्रतिबंधात्मक उपाय शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. या आजाराचं संक्रमण रोखण्यासाठी एकिकडे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असताना वैद्यकीय कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी एक खात्रीशीर इलाज सापडल्याचा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे.
काही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी मलेरियावर केले जाणारे औषधोपचार कोरोनावरही परिणामकारक असल्याचं म्हटलं आहे. फ्रान्स येथे केलेल्या एका चाचणीत मलेरियावर वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोक्वाईन आणि एझिथ्रोमायसिन या दोन औषधांच्या संमिश्र वापराने कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार करता येतात आणि त्यामुळे रुग्ण बरे होत असल्याचा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. फ्रेंच डॉक्टर डीजियर रॉल्ट यांनी हे संशोधन केलं असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर या औषधांचा वापर केल्यास अवघ्या सहा दिवसात कोरोनाचा रुग्ण बरा होतो, असं रॉल्ट यांचं म्हणणं आहे. रॉल्ट यांच्या या दाव्याला चीन आणि दक्षिण कोरिया या देशांतील वैद्यकीय सूचनावलींनीही दुजोरा दिला आहे.
हायड्रॉक्सिक्लोक्वाईन हे औषध 1955 पासून मलेरियावरील खात्रीशीर इलाज म्हणून अधिकृतरित्या वापरात आहे. हे औषध जागतिक पातळीवर उपलब्ध असून त्याचा दरही स्वस्त आहे.



























































