कोरोनाबद्दलची भीती संपणे हाच त्या आजाराचा शेवट!

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. या आजाराची माहिती, आकडेवारी दररोज येणारी आकडेवारी कधी आपल्याला चिंतेत टाकणारी, तर कधी बरे होणाऱया रुग्णांची संख्या पाहिल्यानंतर दिलासा देणारी ठरत आहे. हा प्रत्येक आकडा म्हणजे एक व्यक्ती आहे. या व्यक्तीविषयीचा हा अहवाल आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम राज्य सर्वेक्षण विभाग वर्षानुवर्षे करीत आहे. लाखोंच्या आरोग्याशी खेळणाऱया कोरोना आजाराविषयी राज्य सर्वेक्षण विभागाचे अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्याशी केलेली बातचित.

सार्स, स्वाइन फ्लू आणि आता कोरोना या आजारांच्या काळात तुम्ही काम केले आहे. या आजारांवर औषध सापडेपर्यंत नेमकी कोणती परिस्थिती अनुभवली?
z सार्स, स्वाईन फ्लू आणि आता कोरोना हे सारेच साथरोग! तरी प्रत्येक साथरोगाच्या तपशिलात फरक असतो. 2002 सार्सच्या अनुषंगाने सर्वेक्षण सुरू झालं; परंतु सार्स हिंदुस्थानात आणि महाराष्ट्रात अजिबात आला नाही. 2009 मध्ये स्वाईन फ्लूची साथ आली आणि तो पुणे, नाशिक, नागपूर या भागांत पसरताना दिसला. तेव्हा स्वाइन फ्लूची भीती लोकांमध्ये मोठया प्रमाणावर होती; रुग्णालयात किंवा जवळपास सोडण्याकरताही रिक्षावाले तयार नसत. स्वाईन फ्लू आणि करोना या दोन आजारांत फरक आहे. स्वाईन फ्ल्यूविरोधी ऑसेलटॅमीवीर (टॅमिफ्ल्यू) उपलब्ध होते. लसदेखील लवकरच उपलब्ध झाली. आज कोरोनाचा प्रसाराचा वेग स्वाईन फ्ल्यूपेक्षा जास्त दिसतो आहे, यामागे प्रयोगशाळा सर्वेक्षणही एक कारण आहे. 115 प्रयोगशाळांतून मोठया प्रमाणावर चाचण्या करीत आहोत. स्वाईन फ्ल्यूच्या काळात एवढया प्रयोगशाळा नव्हत्या. केवळ गंभीर स्वरूपाच्या हॉस्पिटलमध्ये भरती असणाऱयांचीच चाचणी होत होती. तेव्हाच्या किंवा आजच्या सर्वेक्षणात हा मोठा फरक आहे.

कोरोना आजाराविषयीच्या जनजागृतीपासून ते कोरोनाची आकडेवारी देण्यासाठीची महत्त्वाची जबाबदारी तुम्ही पार पाडत आहात त्याविषयी…
z कोरोनासारखी साथ लोकसहभागाशिवाय नियंत्रणात आणणे अवघड आहे. लोकांमध्ये कोरोनाचा प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी समाजातील घटक म्हणून आपण काय करू शकतो या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हे आवश्यक आहे. हे काम एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाचा प्रमुख या नात्याने मी आणि माझ्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी टीम करते आहे.

कोरोनाची आकडेवारी राज्यभरातून कशा प्रकारे संकलित केली जाते?
z कोरोना उद्रेकामध्ये जी आकडेवारी समोर येत आहे तेवढय़ा मोठय़ा प्रमाणावर आरोग्य यंत्रणेने आकडेवारी कधीही हाताळलेली नाही. ही आकडेवारी बिनचूकपणे रोजच्यारोज राज्यातील 34 जिल्हे आणि 27 महापालिकांकडून संकलित करणे आव्हानात्मक आहे. जिल्हा पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमात काम करणारे साथरोगतज्ञ, डेटा मॅनेजर, डेटा एंट्री ऑपरेटर हे मनुष्यबळ क्षेत्रीय पातळीवरील डेटा राज्यपातळीवर पाठविण्याचे काम करीत आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून केंद्र सरकारने सुरू केलेले कोव्हिड-19 हे पोर्टल आरटीपीसीआर ऍप, फॅसिलिटी ऍप यासारखे वेगवेगळे ऍप्स डेटा संकलनाचे काम अधिक सुलभ करताहेत. राज्यपातळीवर करोना वॉर रूममध्ये 40 ते 50 अधिकारी आणि कर्मचारी अचूक माहिती आपल्या हातात पडावी याकरता प्रयत्न करीत आहेत.

कोरोनाच्या आकडेवारीवर शंका घेतली जाते. मृतांचा आकडा लपवल्याचा आरोप होतो. नेमकी काय परिस्थिती आहे?
z महाराष्ट्राचे साथरोग सर्वेक्षण हे सुरुवातीपासून अत्यंत प्रभावी आहे. आपण कोणत्याही आजाराची कसलीही आकडेवारी कधीही लपवलेली नाही. ‘स्वाइन फ्लू’च्या राष्ट्रीय आकडेवारीवर नजर टाकली तरी आपल्या लक्षात येईल की या आजाराचे सर्वात अधिक रुग्ण आणि मृत्यू महाराष्ट्राने सातत्याने नोंदविलेले आहेत. आरोग्य क्षेत्रात कोणतीही समस्या सोडवायची असेल तर मुळात ती समस्या नेमकी मोजता आली पाहिजे कारण समस्येच्या नेमक्या मोजमापातच तिचे 50टक्के उत्तर दडलेले असते. कोरोनाची आकडेवारी, तिची व्याप्तीही खूप मोठी असल्याने काही बॅकलॉग निश्चितपणे राहतो. काही बाधित रुग्ण, मृत्यू हे राज्यपातळीवर उशिरा समजतात किंवा अनेकदा त्यांच्या पत्त्यातील नेमकेपणाच्या अभावामुळे ते कोणत्या जिह्यात किंवा महापालिकामध्ये समाविष्ट करायचे याबाबतचा निर्णय घेण्यासाठी काही वेळ लागतो एवढेच!

दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. या सर्व परिस्थितीवर कधीपर्यंत नियंत्रण येईल. ही आकडेवारी कमी होईल का?
z करोना आजारावर नियंत्रण कधी येईल, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आजच्या घडीला करोनाच्या रुग्णांची संख्या अधिक असली तरी या आजाराचे स्वरूप सौम्य आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. शंभरपैकी 80 रुग्ण हे लक्षण विरहित किंवा सौम्य स्वरूपाचे असणे, हे आजाराच्या या स्वरूपाबद्दल पुरेसे बोलके आहे. या आजाराच्या नियंत्रणासाठी सर्वेक्षणापासून ते आरोग्य शिक्षणापर्यंतचे सर्वतोपरी प्रयत्न आपण करतो आहोत. पण आपण लक्षात घेतले पाहिजे की, कोणतीही संसर्गजन्य आजाराची साथ दोन प्रकारे संपते. एक म्हणजे साथीचा वैद्यकीय शेवट अर्थात त्या आजाराचा एकही रुग्ण पुन्हा न आढळणे. साथरोगाबाबत हे अर्थातच अशक्य असते. 2009 साली आलेला स्वाइन फ्ल्यू आजही आढळतो आहे. साथीचा दुसरा शेवट म्हणजे तिचा सामाजिक अंत! याचा अर्थ असा की आजार पूर्णपणे नाहीसा होत नाही, परंतु लोकांमध्ये आजाराबद्दल, साथीबद्दल जी भीती आहे ती संपते, या अर्थाने त्या साथीचा सामाजिक शेवट होतो. कोरोनाच्या या साथीबद्दल देखील हेच खरे आहे. कोरोनाचा वैद्यकीय शेवट कधी होणार हे सांगणे कठीण असले तरी करोनाबद्दलची आपल्या मनातील भीती घालवणे हे आपल्या हातात आहे आणि म्हणून या साथीचा सामाजिक शेवट हा तुमच्या-माझ्या निर्धारामध्ये आणि धैर्यामध्ये दडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या