
राज्यात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे.
एक्स्प्रेस-वे वर खासगी वाहनांना प्रतिबंध केला जात असून फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना जाण्याची परवानगी दिली जात आहे. फक्त एक्स्प्रेस वे नव्हे तर जुन्या मुंबई-पुणे हायवेवरही पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. मुंबईतील नागरिकांनी शहराबाहेर जाऊ नये तसंच पुणे किंवा इतर ठिकाणच्या लोकांनी मुंबईत प्रवेश करू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
खालापूर, कळंबोली, कामशेत या टोलनाक्यांवर पोलिसांचा बंदोबस्त असून पोलीस नागरिकांची ओळखपत्रं तपासत आहेत. जे लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत त्यांना पुन्हा आपल्या घरी पाठवलं जात आहे. कोरोनाची लागण झालेले सर्वात जास्त रुग्ण मुंबई आणि पुण्यात सापडले असून या दोन शहरांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सर्वत्र लॉकडाऊनचे आदेश असूनही मुंबई आणि पुण्यात रस्त्यांवर खासगी वाहने दिसत आहेत. लोकांना घरी थांबण्याचं आवाहन करूनही लोकं घराबाहेर पडत असल्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे.

























































