कोरोनाचा वाढता धोका; मुंबई लोकलच्या फेऱ्या कमी करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतही कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे मुंबईतील लोकल फेऱया कमी करण्याचा विचार सुरू आहे. मुंबईत लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूरमध्ये स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. सरकारी पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. उपाययोजना जरी सुरू असल्या तरी त्याचे परिणाम काय होतील हे आज सांगता येणार नाही. मात्र तरीही महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठय़ावर आहे, असे सूतोवाच विजय वडेट्टीवार यांनी केले. आताच्या स्थितीत लॉकडाऊन परवडणारा नाही. अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. पण रुग्णवाढ होत आहे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे राज्यातील काही शहरांत कडक निर्बंध घालावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरु केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली याकडे विजय वडेट्टीवार यांचे लक्ष वेधले असता लोकलमधील गर्दी कशी कमी होईल याचा विचार सुरू आहे. तसेच लोकलच्या फेऱया कमी करण्याच्या विचार होत असल्याचे ते म्हणाले.