पाच दिवस काम, दोन दिवस आराम! पालिकेच्या कोविड योद्ध्यांसाठी नवा ‘ड्युटी फॉर्म्युला’

977

कोरोना रोखण्यासाठी दिवसरात्र झटणार्‍या पालिकेच्या कोविड योद्ध्यांसाठी कामाचा नवा फॉर्म्युला तयार केला आहे. यानुसार ‘पाच दिवस काम आणि दोन दिवस आराम’ या तत्त्वानुसार काम दिले जाणार आहे. यामुळे सलग काम केल्याने थकणार्‍या आरोग्य सेवेतील पालिकेच्या हजारो कामगारांना काहीसा दिलासा मिळणार आहे. याबाबत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी परिपत्रक जारी केले आहे. कर्मचार्‍यांची हजेरी मात्र 100 टक्केच राहणार आहे.

मुंबईत मार्चमध्ये कोनोनाने शिरकाव केल्यापासून आरोग्य सेवेसह इतर सेवांमधील हजारो कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. यामध्ये अनेकांना 24 तास, सलग तीन दिवस काम करावे लागत आहे. यामध्ये विशेषत: आरोग्य सेवेतील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉयसह इतर कर्मचार्‍यांना सलग ड्युटी करावी लागत आहे. यानुसार कर्मचार्‍यांना आराम मिळावा आणि त्यांचीही प्रकृती ठीक राहावी यासाठी पालिका आयुक्तांनी आरोग्य कर्मचार्‍यांना ‘पाच दिवस काम आणि दोन दिवस आराम’ असा फॉर्म्युला सुरू केला आहे. यामध्ये तज्ज्ञ-ज्येष्ठ डॉक्टर आणि महत्त्वाची जबाबदारी असलेले अधिकारी आणि कर्मचार्‍यांना मात्र वगळण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करताना कर्मचार्‍यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यापूर्वी तीन दिवस काम आणि एक दिवस सुट्टी देण्यात येत होती.

कर्मचार्‍यांची राहण्याची व्यवस्था
डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार राहण्याची व्यवस्था रुग्णालयापासून जवळच करण्यात येणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी मुंबई, मुंबई उपनगर आणि मुंबई बाहेरून येणार्‍या सर्व संवर्गातील कर्मचार्‍यांची राहण्याची व्यवस्था परिसरातील हॉटेल्स व्यतिरिक्त, लॉज, हॉस्टेल्स, रिकाम्या वार्डमध्ये चांगली सोय करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करून देण्यात येणार आहे.

55 वर्र्षांवरील कर्मचार्‍यांना नॉन कोविड वर्क
या निर्णयानुसार शासकीय, पालिका रुग्णालय, खासगी रुग्णालयातील दुसर्‍या, तिसर्‍या वर्षाच्या नर्स विद्यार्थिनींना कोविड हेल्थ सेंटरमध्ये नेमणूक करण्यात येणार असून त्यांना वीस हजार रुपये जादा स्टायपेंड देण्यात येणार आहे. दरम्यान, कर्मचार्‍यांची उपस्थिती 100टक्के राहणार असून 55 वर्षांवरील कर्मचार्‍यांना ‘नॉन कोविड वर्क’ देण्यात येणार आहे.

कर्मचार्‍यांच्या मागण्या पूर्ण करणार, महत्त्वपूर्ण बैठकीत प्रशासनाचे आश्वासन
डॉक्टर आणि नर्सेस यांच्या ड्युटीबाबत महापालिकेने परिपत्रक काढल्यानंतर पालिकेच्या केईएम, लोकमान्य टिळक रुग्णालय (शीव) आणि नायर रुग्णालयातील सर्व संवर्गातील कर्मचार्‍यांच्या मागण्या व अडचणींबाबत वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांच्या अध्यक्षतेखाली अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी आणि सर्व संबंधित अधिकारी यांच्याबरोबर म्युनिसिपल कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण चर्चा झाली. त्यावेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन प्रशासनाकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.

सर्व विभागातील कर्मचार्‍यांना सुरक्षेच्या दृष्टीने पीपीई कीट, एन-95 मास्क आणि ग्लोव्हज देण्यात येणार आहेत. बस/एसटीमधून कर्तव्यावर हजर राहणार्‍या सर्व संवर्गातील कर्मचार्‍यांना सोशल डिस्टन्सिंग राखता येत नसल्यामुळे बस/एसटी वाढविण्यात याव्यात तसेच मध्यम, पश्चिम, हार्बर रेल्वे लवकर सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात येणार आहे. मृत कोरोनाबाधिताचे शव बांधण्यासाठी विशेष प्रोत्सहन भत्ता 1,000 रुपये परिपत्रकाप्रमाणे देण्याचे मान्य करण्यात आले. कोरोनाशी लढणार्‍या सर्व संवर्गातील कर्मचार्‍यांना 300 रुपये दैनंदिन भत्ता, कायम कर्मचार्‍यांना 1 एप्रिल 2020 पासूनचा भत्ता बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. रिलायन्स कंपनीकडून देण्यात येणार्‍या 1500 रुपयांच्या किराणा कूपन्स सर्व संवर्गातील कर्मचार्‍यांना देण्यात येणार आहेत. सर्व संवर्गातील कर्मचार्‍यांचा 50 लाख रुपयांचा विमा तसेच कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊन निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना 50 लाखांचे विशेष अनुदान आणि शैक्षणिक अर्हतेनुसार कायस्वरुपी नोकरी देण्यात यावी अशी शिफारस महापालिका आयुक्तांकडे करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. कोरोनाविरोधात लढताना जीवाची पर्वा न करता अत्यंत प्रामाणिकपणे काम करणार्‍या रोजंदारी, बहुउद्देशीय कामगारांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याबाबत आयुक्तांकडे शिफारस करण्यात येणार आहे. तसेच 55 वर्षांवरील सर्व संवर्गातील कर्मचार्‍यांना आणि गरोदर महिलांना कोरोनाबाबतचे काम देण्यात येणार नसल्याचे मान्य करण्यात आले. शिवाय कोणत्याही कर्मचार्‍यास कोरोनाची बाधा झाल्यास प्राधान्याने आपल्या रुग्णालयात दाखल करून उपचार देण्याचे मान्य करण्यात आले आहे, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या कर्मचार्‍यांना कॉरंटाईन करण्याचे तसेच दुर्दैवाने कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांना आपल्या रुग्णालयात दाखल करण्याचे मान्य करण्यात आले आहे.

बीकेसी कोरोना हेल्थ सेंटरला एशियन हार्ट इन्स्टिट्युटने दिला आयसीयू विभाग
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील पालिकेच्या  कोरोना हेल्थ सेंटरला एशियन हार्ट इन्स्टिट्युटने आपला आयसीयू विभाग दिला आहे. यामुळे सदर हेल्थ सेंटरमधील रुग्णांना सुविधा निर्माण होणार आहे. वांद्रे (पूर्व) मध्ये असणार्‍या वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात असणार्‍या ‘एमएमआरडीए’ मैदानावर तब्बल 1 हजार 26 खाटांची सोय असणारे कोविड आरोग्य केंद्र नुकतेच उभारण्यात आले आहे. एमएमआरडीने हे आरोग्य केंद्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेकडे सुपूर्द केले आहे. या आरोग्य केंद्रातील सुमारे निम्म्या खाटांलगत म्हणजेच 504 खाटांसोबत प्राणवायूच्या (ऑक्सिजन) पुरवठ्याचीदेखील सोय करण्यात आली आहे. यानुसार याठिकाणी उपचार घेणार्‍या रुग्णांना गरज भासल्यास, लगतच्या परिसरातील ‘एशियन हार्ट इन्स्टिट्यूट’ च्या अतिदक्षता विभागात हलविणे शक्य होणार आहे. या सहकार्याबद्दल पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी एशियन हार्ट इन्स्टिट्युटचे आभार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या