‘लॉकडाऊन’नंतर केवळ स्लीपर ट्रेन चालविण्याची रेल्वेची योजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
railway-zero-accident

राज्या-राज्यात अडकलेल्या मजुरांसाठी विशेष गाड्या चालविण्याची एकीकडे मागणी होत असतानाच दुसरीकडे लॉकडाऊन संपल्यानंतर केवळ स्लीपर ट्रेन चालविण्याची केंद्र सरकारची योजना असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या गाड्या सोशल डिस्टन्सिंगची संपूर्ण काळजी घेऊन चालविण्यात येतील आणि त्यांचे भाडे देखील जास्त असेल. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी देशातील टाळेबंदी 3 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. या काळात सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. इतिहासामध्ये इतक्या दीर्घकाळासाठी रेल्वे आणि विमानवाहतूक बंद ठेवावी लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.

3 मेच्या नंतर लॉकडाऊन वाढविण्यात येणार की संपणार याचं उत्तर कोणीही देऊ शकत नाही. केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये पुन्हा एकदा याबाबत विस्ताराने चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र जेव्हा केव्हा लॉकडाऊन संपुष्टात येईल तेव्हा सेवा सुरू करताना रेल्वे पूर्ण काळजी घेणार आहे. सुरूवातीला केवळ ग्रीन झोन मध्येच रेल्वेच्या विशेष गाड्या चालल्या जातील अशी योजना आकाराला येत आहे. सुरूवातीला रेल्वे केवळ कोरोना संदर्भात घोषित केलेल्या ग्रीन झोन मधूनच स्लीपर कोच सेवा असलेल्या ट्रेन धावतील. कोरोनाच्या संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोनमधून या ट्रेन चालविण्यात येणार नाहीत. या ट्रेनचे भाडे देखील जास्त असणार आहे. अत्यावश्यक प्रवासासाठीच या गाड्या चालवण्याबाबत विचार सुरू आहे.

ज्याचं तिकीट कन्फर्म त्यांनाच प्रवेश

जोपर्यंत कोरोनाचे समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत कमीत कमी लोकांनी रेल्वेने प्रवास करावा यासाठी रेल्वेचे आखणी करते आहे. सुरूवातीला केवळ स्लीपर ट्रेन चालतील आणि एसी कोच, जनरल कोच नसतील. ज्यांचे तिकीट कन्फर्म असेल तेच प्रवास करु शकतील. रेल्वेने यापूर्वीच प्रायव्हेट गाड्यांमधून ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग आणि विद्यार्थी यांना भाड्यात मिळणारी सवलत देणं थांबवलं आहे. रेल्वेने कोरोना व्हायरस विरूद्धच्या लढाईसाठी पाच हजार आयसोलेशन कोच तयार केले आहेत.