
आता सहा महिने होत आले तरी घरी जायचा मार्ग काही मोकळा होईना. त्यांच्या नजरा घराच्या दिशेने लागून राहिल्यात, पण लॉकडाऊनमुळे सगळी कोंडी होऊन बसलीय. कधी आईवडिलांना भेटतोय, अशी आस लावून डोंगरी बालगृहातली 70 मुले बसली आहेत.
हरवलेली तसेच रेस्क्यू आँपरेशनमध्ये सापडलेली जवळपास 70 मुले सध्या डोंगरीच्या बालगृहात अडकून पडली आहेत. त्यातली 10 मुले महाराष्ट्रातली, तर उर्वरित मुले परराज्यातली आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ही मुले बालगृहात असून कधी घरी जाता येणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत. बालगृह प्रशासनाने त्या मुलांच्या पालकांशी संपर्क साधला आहे; पण लॉकडाऊनमुळे वाहतुकीचे सर्व मार्ग बंद झाल्याने बालगृह प्रशासनालादेखील काहीच करता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत परिस्थिती सर्वसाधारण होत नाही तोपर्यंत मुलांना बालगृहातच राहावे लागणार आहे.
पालकांशी संवाद, योगा
मुलांच्या पालकांशी आमचा संपर्क झालाय; पण मुले आणि पालकांची भेट होणे कठीण बनले आहे. असे असले तरी आठवडय़ातून एकदा आम्ही प्रत्येक मुलाला त्याच्या पालकाशी संपर्क साधून संवाद साधण्याची संधी देतो. यामुळे मुले आणि पालक एकमेकांची खुशाली विचारतात. तेवढाच त्यांना मानसिक आधार मिळतो. आम्ही येथे दररोज मुलांचा योगा घेतो. त्यांना पौष्टिक आहार देतो. त्यांची सर्व काळजी घेतो असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सध्या लॉकडाऊन आहे. परिणामी आम्हाला काहीच हालचाल करता येत नाही. या मुलांची त्यांच्या पालकांसोबत कधी भेट होते, ते कधी त्यांच्या घरी जातात याचीच आम्हीदेखील वाट पाहत आहोत. वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला की मुलांना त्यांच्या घरी पाठविले जाईल- राहुल कंठीकर, अधीक्षक बाल व निरीक्षण गृह, डोंगरी.



























































