कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई-पुण्यात नियमांची कठोर अंमलबजावणी करा!

1354

कोरोना संदर्भात केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या सूचना पाळल्या तर आपण या संकटावर मात निश्चितच करू, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई-पुण्यात नियमांची कठोर अंमलबजावणी करा असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. त्यांनी पालघरच्या घटनेवरून राजकारण करू नका असेही विरोधकांना खडसावले.

कोरोनामुळे देशात व राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता तीन आठवड्यानंतर अधिक सुधारणांसाठी लॉकडाऊनचा कालावधी नाईलाजानं वाढवावा लागला. 3 मेपर्यंत अजून बारा दिवसांचा कालावधी आहे. या काळात आपण आपली काळजी घेतली तरच 3 मे नंतर परिस्थितीत बदल होईल, नियमावलीमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय कदाचित घेतला जाईल. मात्र या दरम्यान परिस्थिती अधिक बिघडू नये यासाठी आपण काळजी घ्या घरातून बाहेर पडू नका असे आवाहन शरद पवार यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना केले.

पालघरच्या घटनेचे राजकारण नको
पालघरमध्ये झालेले हत्याकांड अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकरणातील काही लोकांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही. मात्र तरीही काही लोक या घटनेचे राजकारण करत असल्याचे सांगत शरद पवार यांनी पालघरच्या घटनेचे राजकारण करू नका, राजकारण नंतरही करता येईल अशा शब्दात विरोधकांना खडसावले.

आपली प्रतिक्रिया द्या