
परीक्षा काळात शिक्षण मंडळाने जाहीर केलेले समुपदेशक यांचे मोबाईल क्रमांक दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरत आहेत. समुपदेशकाच्या मोबाईलवर संपर्क साधून विद्यार्थी निकाल कधी लागणार, भूगोलाचे गुण कसे मोजणार, अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आता कशी होणार, असे प्रश्न विचारीत आहेत. विशेष म्हणजे समुपदेशकांचे हे मोबाईल क्रमांक दहावी-बारावीच्या परीक्षा काळात ताण तणावात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने जाहीर केले होते. पण आता कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळातही विद्यार्थी या हेल्पलाइनवर संपर्क साधत आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीची शेवटचा भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे परीक्षक, नियामक यांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी साठीही घेऊन जाता आल्या नाही. त्यामुळे सहाजिकच निकाल कधीपर्यंत जाहीर होईल, भूगोलाचे गुण कसे मोजले जातील, पुढे अकरावी प्रवेश प्रक्रियेचे काय होणार अशा अनेक प्रश्नांचा भडीमार सध्या बोर्डाच्या समुपदेशकांची मोबाईलवर सुरू आहे.
विद्यार्थ्यांना भिती टक्केवारीची
दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांना टक्केवारी घसरण्याची भीती वाटत आहे. भूगोल विषयाचे गुण इतिहासात मिळालेल्या गुणांच्या आधारे किंवा शाळा स्तरावर झालेल्या भूगोलाच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार मूल्यमापन करून दिल्यास आपल्याला किती गुण मिळतील हा विचार अनेक विद्यार्थ्यांच्या मनात आहे. इतिहास विषय कच्चा असलेल्या विद्यार्थ्यांना सामाजिकशास्त्रामध्ये कमी गुण मिळाले तर एकूण टक्केवारीत परिणाम होण्याची भीती काहींना सतावत आहे























































