पुलवामात दहशवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत बार्शीचे वीरजवान सुनील काळे शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागातील बांदझू परिसरात मंगळवारी पहाटे दहशतवाद्यांशी चकमक उडाली. या चकमकीमध्ये सुनील काळे (वय 41 वर्षे ) हे शहीद झाले आहे. काळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या पानगावचे रहिवासी होते. या चकमकीत हिंदुस्थानच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं असून या परिसरात बराचवेळ सर्च ऑपरेशन सुरु होतं.

शहीद सुनील काळे यांना वीरमरण प्राप्त झाल्याचे वृत्त कळताच त्यांच्या मूळगावावर शोककळा पसरली असून या गावातल्या सगळ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सुनील काळे लष्करी सेवेतून निवृत्त होणार होते, मात्र त्यांनी निवृत्ती न घेता सेवा वाढवून घेतली होती. त्यांची बदलीही झाली मात्र लॉकडाऊनमुळे त्यांना तिथेच थांबावे लागले.सुनील काळे यांना मंगळवारी पहाटे दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुलं, आई, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे.

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील बांदझू येथे मंगळवारी पहाटेपासून सीआरपीएफचे जवान आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त दलाची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू झाली होती. सोमवारी रात्री पुलवामा येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या छावणीवर गोळीबार करुन आणि ग्रेनेड फेकून दहशतवादी पळून गेले होते. त्यांचा शोध घेत असताना ही चकमक उडाली होती. सुरक्षा दलाच्या जवानांनी या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारलं. पुलवामामध्ये ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला तो संपूर्ण परिसर भारतीय सुरक्षा दलाकडून घेरण्यात आला असून तिथे बराच काळ शोध मोहीम सुरू होती.काही दहशतवादी अजूनही या भागात लपून बसल्याची माहिती आहे.