कोरोना व्हायरसचा मुकेश अंबानींना फटका, गमावले 5 अब्ज डॉलर्स

930

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. चीनमध्ये या आजाराने हाहाकार माजवला असून आतापर्यंत जगभरात 2800 जणांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसचा जगातील उद्योगधंद्यांवरही मोठा परिणाम झाला असून अनेक श्रीमंत उद्योगपतींचे कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान होत आहे. हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना देखील या व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. अंबानींना आता पर्यंत 5 अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. हा फटका अवघ्या गेल्या 15 दिवसात बसला आहे.

अंबानींव्यतिरिक्त देशातील अनेक उद्योगपतींना याचा फटका बसत आहे. विप्रो कंपनीला देखील कोरोनामुळे 869 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे. शापूरजी पॅलोनजी ग्रुपचे संस्थापक पॅलोनजी मिस्त्री यांच्या संपत्तीत 463 दशलक्ष डॉलर्सने तर उदय कोटक यांच्या संपत्तीत 126 दशलक्ष डॉलर्सने घट झाली आहे. आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांच्या संपत्तीतून 884 दशलक्ष डॉलर्स कमी झाले आहेत. तर गौतम अदानी यांना गेल्या महिन्याभरात 496 दशलक्ष डॉलर्सचा फटका बसला आहे.

कोरोना व्हायरसमुळे सोन्याच्या भावात वाढ 

सोन्याच्या दरात सोमवारी 953 रुपये इतकी वाढ होऊन ते 44 हजार रुपये प्रतितोळा इतकं झालं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला चांगलीच दरवाढ मिळाली आहे. सध्या प्रतिऔंस 1680 डॉलर इतक्या दराने सोनं आंतरराष्ट्रीय बाजारात विकलं जात आहे. हा दर वाढून आता 1700 इतका होऊ शकतो. त्याचा परिणाम हिंदुस्थानातील सोन्याच्या भावावर पडण्याची शक्यता असून तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही दरवाढ आता 45 हजारांवर जाणार आहे. हिंदुस्थानात आता लगीनसराईचा मोसम आहे. तो पुढचे किमान तीन महिने सुरू राहणार आहे. मात्र आता या दरवाढीचा सामान्य नागरिकांना बसणार आहे असे दिसते. सध्या चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. जेव्हा अनिश्चिततेचं वातावरण तयार होतं, तेव्हा गुंतवणूकदार आर्थिक गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय चोखाळतात. सोनं हा एक खात्रीचा पर्याय असल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे सोन्याचे भाव सतत वाढत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या