
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेने अत्यावश्यक सेवा आणि आपल्या कार्यक्षेत्राबाहेरून येणार्या कर्मचार्यांच्या निवासाची व्यवस्था आपल्या कार्यक्षेत्रातच करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणापासून जवळ असलेल्या हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात येईल. या ठिकाणी त्यांना सर्व सुविधाही पालिकेच्या माध्यमातून पुरवण्यात येतील. दरम्यान, मुंबईतून नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीत जाणार्या कर्मचार्यांमुळे कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतील कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, सेवेततील बहुतेक कर्मचारी महानगरपालिका क्षेत्राबाहेर नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली अशा दूरच्या ठिकाणी राहत असल्यामुळे येण्या-जाण्यात त्यांचा वेळ जातो. शिवाय प्रवासादरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. तसेच मुंबईतून कोरोनाग्रस्त आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यास या ठिकाणी संपर्कात येणार्यांनाही लागण होण्याचा धोका वाढत होता. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महापालिकेने आपापल्या कर्मचार्यांची व्यवस्था आपापल्या कार्यक्षेत्रातच करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार मुंबई महानगर पालिकेने पाइव्ह स्टार हॉटेल, थ्री-स्टार हॉटेल आणि विनातारांकित हॉटेलमध्ये आपल्या कर्मचार्यांची व्यवस्था केली आहे.
ताज हॉटेलमध्ये विनाअट व्यवस्था
‘लॉकडाऊन’ जाहीर झाल्यापासून पालिकेच्या काही रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचार्यांना ‘ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स’मधून मोफत जेवण पुरविण्यात येत आहे. आता तर ताज हॉटेलने स्वत: पुढाकार घेऊन महापालिकेच्या कर्मचार्यांची निवास-जेवणाची व्यवस्थाही करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एक खोली दोन कर्मचार्यांना दोन हजारांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच रकमेत संबंधित कर्मचार्यांना निवास, न्याहारी, दोन्ही वेळचे जेवण व कपडे धुण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवी मुंबईत सातशे कर्मचार्यांची व्यवस्था
नवी मुंबई शहरात कोरोनाचा फैलाव वाढण्यास मुंबई आणि ठाणे शहरात काम करणारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कारणीभूत ठरले आहेत. १५ कर्मचार्यांपासून सुमारे १२५ जणांना कोरोनाची बाधा झाली. तीच परिस्थिती नवी मुंबई शहराच्या आसपासच्या शहरांमध्ये उद्भवू नये यासाठी महापालिका प्रशासनाने शहराबाहेर राहणार्या आपल्या कर्मचार्यांना शहरातच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनीही त्याला मान्यता दिली आहे. सुमारे सातशे कर्मचार्यांच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात येणार आहे.






























































