कोरोना संक्रमण टाळण्यासाठी असाच प्रतिसाद कायम ठेवा – राहुल द्विवेदी

636

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला तसेच जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला नगर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही लढाई अजून संपलेली नाही. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका संपेपर्यंत घराबाहेर पडू नका. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

जनता कर्फ्युला केवळ नगर शहरातच नाही तर सर्व तालुक्यांची ठिकाणे, नगरपालिका, नगरपंचायत, मोठ्या लोकसंख्येची शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोना संक्रमणाचा धोका ओळखून नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. सकाळपासूनच गजबजलेल्या बाजारपेठा, बसस्थानके, महत्वाच्या चौकांमध्ये शुकशुकाट होता. सर्व रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. नगर शहरातील महत्वाचे चौक, बाजारपेठा आज अक्षरश: ओस पडल्याचे चित्र होते. कापड बाजार, चितळे रोड, पाईपलाईन रोड, प्रोफेसर चौक, दिल्ली गेट अशा नेहमी वर्दळ असणाऱ्या ठिकाणी शुकशुकाट होता. शहरातील माळीवाडा, तारकपूर आणि स्वस्तिक बसस्थानकांवर प्रवाशांची ये-जा नव्हती. बसेसही बंद ठेवण्यात आल्या होत्या. नगर शहराबरोबरच संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, शिर्डी, लोणी, राहाता, पाथर्डी, शेवगाव, कर्जत-जामखेड, कोपरगाव, श्रीगोंदा, पारनेर, अकोले, नेवासा अशा ठिकाणीही नागरिकांनी जनता कर्फ्यूला पाठिंबा दिला. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी अशाच प्रकारे सर्वांनी कृतिशील राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

आगामी दोन आठवडे आपल्या प्रत्येकासाठी महत्वाचे आहेत. हा धोका वाढणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे, त्यांनी ते करावे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि आरोग्य विभागाने केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या